'एक घर मंतरलेलं' या रहस्यकथेच्या माध्यमातून आणखी एका निराळ्या विषयावरील मालिका झी युवा वाहिनीने प्रेक्षकांसाठी आणली. मृत्युंजय बंगल्याचं गूढ, त्याचा गार्गीच्या आयुष्याशी आलेला संबंध आणि तिच्या आयुष्यात घडत असलेल्या अनाकलनीय घटना यांनी प्रेक्षकांवर अनेक दिवस जादू केली. मार्च महिन्यात सुरु झालेल्या या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. कधी घाबरवून टाकत, तर कधी निखळ आनंद देत या भयकथेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या मंतरलेल्या घराची जादू अजूनही कायम असली, तरीही ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या भयानक घरामुळे अनेक पात्रांना मृत झालेले पाहत असतांना, आपल्या आवडीच्या पात्राचा मृत्यू होऊ नये, ही प्रेक्षकांच्या मनात असलेली भीती यापुढे फार काळ त्यांना बाळगावी लागणार नाही. अर्थात, सर्वांची लाडकी मालिकाच संपत असल्याने, चाहत्यांच्या मनात दुःखाची किनार जरूर आहे.
केवळ प्रेक्षकच नाही, तर या मालिकेतील कलाकारांना सुद्धा मालिका संपत असल्याने भरून आले आहे. या आठवड्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. या भागाचे चित्रीकरण करत असतांना सेटवरील सर्वच मंडळी भावुक झाली होती. 'मृत्युंजय' बंगल्याविषयीचे रहस्य उकलणाऱ्या, 'एक घर मंतरलेलं' या मालिकेच्या सेटवरील मंडळी घरातील कुटुंबाच्या सदस्यांप्रमाणे आहेत. चित्रीकरण संपत असतांना, घर सोडत असल्याची भावना सगळ्याच कलाकारांच्या मनात होती.
'गार्गी महाजन' ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री 'सुरुची आडारकर', हिने आपला अनुभव या शब्दांत मांडला.
"झी युवा वाहिनीसोबत मी ही दुसरी मालिका करत होते.झी युवाने आणि आयरिस प्रोडक्शन मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. 'एक घर मंतरलेलं' ही एक वेगळ्या धाटणीची मालिका होती. अशाप्रकारची भूमिका मला पहिल्यांदाच करायला मिळाली. त्यामुळे, मालिका संपत असल्याचं, जसं दुःख आहे, त्याचप्रमाणे वेगळं काहीतरी करायला मिळाल्याचं समाधान सुद्धा या मालिकेमुळे मला मिळालं आहे."
'क्षितिज निंबाळकर' ही या मालिकेतील, एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारा अभिनेता 'सुयश टिळक' यालाही आपल्या भावना अनावर झाल्या. मालिकेविषयी सुयश टिळक म्हणाला;
"मला या कुटुंबाचा एक भाग करून घेतल्याबद्दल मी आयरिस प्रोडक्शन्सचे आभार मानतो. एका उत्तम टीमसोबत काम करण्याची संधी यामुळे मला मिळाली. या मालिकेच्या माध्यमातून खूप गोष्टी शिकायलाही मिळाल्या. या सकारात्मक वातावरणातून एक नवी ऊर्जा मी घेऊन जात आहे."
No comments:
Post a Comment