मृण्मयी देशपांडे ही गुणी अभिनेत्री बऱ्याच कालावधीनंतर सूत्रसंचालनाच्या भूमिकेत आपल्याला झी युवावरील युवासिंगर एक नंबर या कार्यक्रमाच्या माध्यमातुन बुधवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रेक्षकाना भेटायला येईल. ही भूमिका उत्तम तर्हेने पारपाडण्यासाठी व 'युवा सिंगर्स'च्या मंचावर 'एक नंबर' धुमाकूळ घालण्यासाठी ही अभिनेत्री सज्ज आहे. या बद्दल मृण्मयीशी साधलेला संवाद .
१. एक अभिनेत्री म्हणून तू अनेक दर्जेदार भूमिका केल्या आहेस. प्रेक्षकांनी वेळोवेळी याची पोचपावती सुद्धा दिली आहे. आता एक सूत्रसंचालिका म्हणून भूमिका पार पाडायची आहे. हे तुला आव्हानात्मक वाटत आहे का?
सूत्रसंचालिकेची भूमिका मी या आधी सुद्धा पार पाडली आहे. त्यामुळे त्याकडे मी आव्हान म्हणून बघण्यापेक्षा एक मजेदार अनुभव या दृष्टीने जास्त पाहते. कुठलीही स्क्रिप्ट नसतांना, स्वाभाविक वागण्यातून हे काम करावं लागतं. तुम्ही जेवढे स्वाभाविकपणे व सहजपणे सूत्रसंचलन करता, तेवढे ते अधिक फुलते. त्यामुळे हे माझ्यासाठी आव्हान आहे असं मी म्हणणार नाही.
२. गायन स्पर्धेचं सूत्रसंचालन करण्याचा तुझा अनुभव कसा आहे?
या आधी सुद्धा मी अशा प्रकारच्या स्पर्धेत सूत्रसंचालन केले आहे. संगीतामध्ये एक जादू असते. ते मनाला भिडतं. त्यामुळे अशा वातावरणात दोन दिवस घालवणं मला नक्कीच आवडतं. वेगवेगळी गाणी ऐकायला मिळणं, वेगवेगळे आवाज अनुभवता येतात. त्यामुळे कान तृप्त होण्याचा अनुभव नेहमी येतो.
३. 'युवा सिंगर, एक नंबर'मधील परीक्षकांशी तुझे कशाप्रकारे जमले आहे?
सावनी आणि वैभव ही दोन्ही भिन्न प्रवृत्तीची व्यक्तिमत्व आहेत. वैभव मांगले सोबत मी याआधी सुद्धा काम केलं आहे. सावनी सोबत मी पहिल्यांदाच काम करत आहे. पण, सेटवर असं कधीच वाटत नाही. वैभव सरांच्या स्पष्टवक्तेपणा बद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण, उत्तम आवाजासाठी प्रसिद्ध असलेली सावनी आणि वैभव ही जोडी परीक्षण करत असतांना एक छान अनुभव मिळतो. माझं या दोघांशीही छान जमलं आहे.
४. तू एक उत्तम अभिनेत्री आणि नर्तिका आहेस. तुला गाण्याची किती आवड आहे? तुझा आवडता गायक किंवा गायिका कोण?
मी गाण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं आहे. मध्यमापर्यंतच्या परीक्षा मी दिलेल्या आहेत. माझी आई व बहीण सुद्धा व्यावसायिक गायिका आहेत. त्यामुळे गाण्याची आवड मला आहेच. लता दीदी, भीमसेन जोशी, रफी साहेब ही गाण्यातील दैवते आहेत. त्यामुळे हे गायक आणि गायिका माझे आवडते आहेतच. आताच्या काळातील सांगायचं झालं, तर श्रेया घोषाल आणि अर्जित सिंग यांचा आवाज मला खूप आवडतो.
५. हा कार्यक्रम प्रेक्षकांनी का पाहावा?
'युवा सिंगर, एक नंबर' हा कार्यक्रम नक्की बघा. तुमचे कान तृप्त होतील. संगीतातील विविध प्रयोग अनुभवायला मिळतील. मी आधी म्हणाले त्याप्रमाणे, उत्तम परीक्षणामुळेही या कार्यक्रमाची रंगत वाढते. त्यामुळे संगीताचा छान अनुभव घेण्यासाठी हा कार्यक्रम अवश्य पहा.
६. या कार्यक्रमात तुझं काही 'स्टाईल स्टेटमेंट' असेल का?
मला नेहमी वेगवेगळ्या अवतारांमध्ये तुम्ही नक्की पाहू शकाल. रोज एक निराळं 'स्टाईल स्टेटमेंट' असेल हे निश्चित आहे. पण, हे मी प्रेक्षकांना सांगण्यापेक्षा, त्यांनी हा कार्यक्रम नियमित पाहावा, जेणेकरून माझी निराळी 'स्टाईल' सुद्धा त्यांना पाहायला मिळेल.
७. चित्रीकरणाच्या निमित्ताने, तू ऑफ स्क्रीन काय मजा करतेस?
ऑफ स्क्रीन मजेबद्दल सांगायचं तर, रोज एखाद्या स्पर्धकाला मी माझ्या मेकअप रूममध्ये बसून गायला लावते. मी या सगळ्यांची मोठी ताई असल्याने, हे असं थोडंसं रॅगिंग, थोडी 'ताई'गिरी सुरु असते. अर्थात, हा मजेचा भाग सोडला तर, आमच्यात एक छान बॉण्डिंग झालेलं असल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम माझ्याकडे आहे. एक ताई म्हणून तेदेखील मी पार पाडते आहे. फक्त ऑन स्क्रीनच नव्हे, तर ऑफ स्क्रीन सुद्धा माझं हे काम सुरु असतं.
No comments:
Post a Comment