Wednesday, 28 August 2019

झी टॉकीजची तपपूर्ती!!!! / तपपूर्तीच्या निमित्ताने, १२ अभिमानास्पद बाबींवर 'झी टॉकीज' टाकणार प्रकाश!!


सर्वांची लाडकी मराठी चित्रपट वाहिनी 'झी टॉकीज' आज १२ वर्षे पूर्ण करत आहे. या एका तपाच्या काळात, झी टॉकीजने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. जुन्या व नव्या चित्रपटांची योग्य सांगड घालत प्रेक्षकांना उत्कृष्ट चित्रपटांची मेजवानी ही वाहिनी देत आली आहे. विविध चित्रपटांचे 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' साजरे करत, घरबसल्या दर्जेदार चित्रपट पहिल्यांदा पाहण्याची संधी उपलब्ध करून देणारी ही वाहिनी प्रेक्षकांच्या अगदी जवळची आहे. आज १२ वर्षे पूर्ण करत असताना, मराठी सिनेसृष्टीतील १२ अभूतपूर्व व अभिमानस्पद बाबींवर प्रकाश टाकण्याचे झी टॉकीजने ठरवले आहे.
मराठी सिनेसृष्टीतील विनोदवीरांचा योग्य तो सन्मान व्हावा, या हेतूने 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. दरवर्षी हा सोहळा विनोदवीरांच्या सन्मानार्थ योजण्यात येतो. 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने, प्रेक्षकांच्या पसंतीच्या कलाकरांना सन्मानित करण्यात येऊ लागले. 'गजर कीर्तनाचा' आणि 'मन मंदिरा' यासारखे दर्जेदार कार्यक्रम झी टॉकीज प्रेक्षकांसाठी घेऊन आले. अशा प्रकारचे कार्यक्रम टीव्हीवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना या वाहिनीमुळेच पहिल्यांदा मिळाली. त्यामुळेच सातत्याने १२ वर्षे झी टॉकीजला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभले आहे. आज मनोरंजनाचे एक तप पूर्ण करत असतांना, मराठी सिनेसृष्टीतील महत्त्वपूर्ण अशा १२ घटनांचे स्मरण करण्याचा निर्णय या वाहिनीने घेतला आहे. हे करत असतांना 'दादासाहेब फाळके' यांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. भारतातील चित्रपटसृष्टीचे ते जनक आहेत. 'राजा हरिश्चंद्र' हा भारतात निर्मिती करण्यात आलेला पहिला चित्रपट आहे. मराठी मातीतील 'प्रभात चित्रमंडळ' हे त्या काळात आशिया खंडातील सर्वोत्तम स्टुडिओ म्हणून नावाजलेले होते. दिग्दर्शक भालजी पेंढारकर व महेश कोठारे यांनी मराठी सिनेसृष्टीचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचे काम केले आहे. 'पिंजरा', 'अशी ही बनवाबनवी', 'धूमधडाका' यांसारखे दर्जेदार चित्रपट 'एव्हरग्रीन' म्हणता येतील. थ्रीडी व त्यासारखे इतर आधुनिक तंत्रज्ञान मराठी सिनेमांमध्ये महेश कोठारे यांनी प्रथम आणले आहे. त्यांचे हे योगदान फारच मोलाचे ठरले आहे. दादा कोंडके, रंजना देशमुख यांच्यासारख्या कलाकारांनी दमदार अभिनयाने मराठी इंडस्ट्री समृद्ध केली. 'श्यामची आई', 'श्वास' या चित्रपटांनी राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त करत एक निराळी छाप पाडली. 'श्वास' चित्रपटाने तर, ऑस्करसाठी नामांकन मिळवण्याची किमया करून दाखवली. या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीला पुनरुज्जीवन मिळाले आहे. 'सैराट' चित्रपटानेही 'शंभर करोड'ची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत नाव कमावले आहे. मराठमोळे संगीतकार अजय-अतुल यांनी हॉलीवूड स्टुडिओमध्ये जाऊन गाण्याचे रेकॉर्डिंग केले आहे. मराठी चित्रपट सृष्टीसाठी ही अभिमानाची बाब आहे. आपल्या १२व्या वर्धापन दिनानिमित्त, या सर्वांचे मराठी सिनेसृष्टीसाठी असलेले योगदान झी टॉकीज प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. 

No comments:

Post a Comment