'झी युवा' वाहिनीवरील 'साजणा' या मालिकेतील रावसाहेबांची भूमिका प्रेक्षकांच्या आवडीची ठरू लागली आहे. ही भूमिका साकारणारे दमदार अभिनेते अभिजित चव्हाण यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद;
१. 'साजणा' हा कार्यक्रम स्वीकारण्याचे नेमके कारण काय?
झी सोबत खूप चांगले संबंध आणि ऋणानुबंध आहेत. त्यामुळे 'झी युवा' सोबत काम करण्याची संधी नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय निर्माते शशांक सोळंकी आणि सेव्हन सेन्स मीडियासोबत सुद्धा अनेकवेळा काम केलेलं आहे. त्यामुळे मी हा कार्यक्रम स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
२. या कार्यक्रमातील तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल?
आमदार रावसाहेब जाधव यांची भूमिका मी मालिकेत करत आहे. स्वतःचा शब्द हाच शेवटचा शब्द असं म्हणणारे आणि त्याप्रमाणे वागणारे असे हे व्यक्तिमत्व आहे. कावेबाज स्वभावाचा हा माणूस घरात सुद्धा सर्रासपणे राजकारण करतो. आपल्या एखाद्या इच्छेसाठी रावसाहेब साऱ्या घराला वेठीस धरू शकतात. उद्दाम आणि उर्मट असं हे पात्र आहे. रावसाहेबांचा स्वभाव माझ्या मूळ स्वभावाच्या अगदीच विरुद्ध आहे. त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती.
३. सहकलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
सगळ्याच सहकलाकारांसोबत मी पहिल्यांदाच काम करत आहे. पण सगळ्यांसोबत काम करताना खूपच मजा येते. सारे सहकलाकार, ही केवळ एक टीम नसून ते एक कुटुंब झालेलं आहे. अगदी जेवायला सुद्धा आम्ही सगळे सोबतच बसतो. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन सुद्धा खूप छान अनुभव येत आहे.
४. या भूमिकेबद्दल प्रेक्षकांकडून व चाहत्यांकडून कसा प्रतिसाद मिळत आहे?
ही भूमिका नकारात्मक असल्यामुळे एका निराळ्या प्रकारातील प्रतिसाद अनुभवायला मिळतो आहे. भेटलेले अनेक प्रेक्षक, रावसाहेब रमा आणि प्रतापचा छळ करत असल्याने रागावलेले दिसतात. ही मला माझ्या कामाची पोचपावती वाटते. शिवाय मालिका लोक आवडीने आणि समरस होऊन बघत असल्याचं यातून कळतं.
No comments:
Post a Comment