मराठी सिनेमांनी नेहमीच गरुडझेप घेत देश-विदेशांतील सिनेमहोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री उषा जाधवची मुख्य भूमिका असलेला 'माई घाट : क्राइम नं.103/2005' हा मराठी सिनेमा मागील बऱ्याच दिवसांपासून भारतासोबतच परदेशांमधीलही आघाडीच्या सिनेमहोत्सवांमध्ये कौतुकाची थाप मिळवत आहे. नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडीया (इफ्फी)मध्येही या चित्रपटाने आपलं अस्तित्व कायम राखले आहे. सत्य घटनेवर आधारीत असलेल्या 'माई घाट : क्राइम नं.103/2005' या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी उषा जाधवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जगभरातील ७६ देशांमधील एकूण २०० सिनेमांमधून निवडलेल्या १५ उत्कृष्ट सिनेमांमध्ये दर्जेदार अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींमधून उषाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड झाल्याने हा पुरस्कार सर्वार्थाने या चित्रपटासाठी अभिमानास्पद असून, मराठी सिनेसृष्टीसाठीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवणारा आहे.
ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरीने उषाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड केली. जॉन बेली आणि त्यांच्या पत्नी कॅरोल लिटीलटोन यांनीही उषाच्या अभिनयाचं कौतुक केलं. 'माई घाट : क्राइम नं.103/2005' हा सिनेमातील उषाचा अभिनय पाहून जॅान खूप प्रभावित झाले होते. सिनेमा पाहिल्यावर त्यांनी लगेच गुगलवर उषाबाबत सर्च केलं, तेव्हा त्यांना एका तरुण मुलीची माहिती समोर आली. ती वाचून आणि फोटो पाहून ते आश्चर्यचकीत झाले. आपण कदाचित चुकीच्या व्यक्तीला शोधलं असावं असा क्षणभर त्यांना भ्रम झाला, पण पार्टीत जेव्हा त्यांची उषाशी भेट झाली तेव्हा त्यांचा त्यावर खऱ्या अर्थाने विश्वास बसला. इतक्या तरुण वयात वयस्कर स्त्रीची व्यक्तिरेखा लीलया साकारल्याबद्दल जॅान यांनी उषाचं खूप कौतुक केलं. उषाचा अत्यंत ऑथेंटिक लुक डिझाईन करून अनंत महादेवन यांनी कमाल केल्याचे जॉन बेली आणि त्यांच्या सहकार्यांनी व्यक्त केले. या ज्युरी पॅनलमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लीली रॅमसी (युके दिग्दर्शक), रॅाबिन कम्पेलो (फ्रेंच दिग्दर्शक), झॅन अँग (चायनीज दिग्दर्शक), रमेश सिप्पी (भारतीय दिग्दर्शक)या सर्वांनी एकमताने उषाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी निवड केल्याने हा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे.
अत्यंत मानाचा समजला जाणारा इफ्फीमधील पुरस्कार पटकावल्यानंतर उषाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. भारतीय सिनेसृष्टीतील मराठी चित्रपटातील मराठमोळ्या अभिनेत्रीला हा पुरस्कार मिळाल्याचा तिला सर्वात जास्त आनंद आहे. याबाबत ती म्हणाली की, इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यानं खूप खूप छान वाटतंय. मराठी सिनेसृष्टीत असल्याचा अभिमान वाटतोय. केरळमधील प्रभावती अम्मा या मातेनं पोलीस कोठडीत चुकीच्या पद्धतीने मृत पावलेल्या आपल्या मुलावरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी १३ वर्षे दिलेल्या लढ्याची सत्य घटना 'माई घाट : क्राइम नं.103/2005' च्या माध्यमातून जगासमोर आणण्यात आली आहे. लोकप्रिय अभिनेते – दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकाचा स्पर्श लाभल्यानं वास्तवात घडलेल्या घटनेला पडद्यावरही न्याय मिळू शकला आहे. त्यांच्यासोब खूप गोष्टी नव्याने शिकता आल्या. या सिनेमाच्या निमित्तानं नवं व्हिजन असलेल्या मोहिनी गुप्ता या तरुण निर्मातीसोबत काम करण्याची संधी लाभली. हा पुरस्कार जरी मला मिळाला असला तरी या सिनेमाच्या संपूर्ण टीमनं घेतलेल्या मेहनतीचा हा परीपाक आहे.
हिंदीपासून प्रादेशिक सिनेसृष्टीपर्यंत सर्वत्र सर्जनशील दिग्दर्शक अशी ओळख असणाऱ्या अनंत महादेवन यांनी या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा आपल्या अनोख्या दिग्दर्शनशैलीची झलक दाखवली आहे. या चित्रपटातून केवळ सत्य घटना पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न नसून, एका आईनं आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाची गाथा यशस्वीपणे सादर करत रुपेरी पडद्यावरही त्या घटनेला तितक्याच उचितपणे न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचं महादेवन मानतात. उषा जाधव एक अप्रतिम अभिनेत्री आहे. आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांमधून तिनं यापूर्वीही हे सिद्ध केलं आहे, पण 'माई घाट : क्राइम नं.103/2005' मधील तिची व्यक्तिरेखा म्हणजे या सर्वांचा कळस आहे. तिनं ज्या प्रकारे प्रभावती अम्माची व्यक्तिरेखा साकारली, ती साकारण्यासाठी मेहनत घेतली, कॅमेरा फेस करण्यापूर्वी केरळमध्ये घडलेल्या त्या घटनेचा सखोल अभ्यास केला आणि त्यानंतर ती भूमिका समजून घेत साकारली याचं कौतुक करावं तेवढं थोडं असल्याचं महादेवन यांचं मत आहे.
निर्मात्या मोहिनी गुप्ता यांनी 'माई घाट : क्राइम नं.103/2005' या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. पहिल्याच प्रयत्नात देश-विदेशातील आघाडीच्या विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये 'माई घाट'ला मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत त्या खूप उत्साही आहेत. इफ्फीमध्ये उषाला मिळालेल्या आणि इतर चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारांबाबत आपल्या भावना व्यक्त करताना मोहिनी म्हणाल्या की, उषा एक उत्तम अभिनेत्री आहे हे पुन्हा एकदा जगभरातील ज्युरींच्या दृष्टीकोनातून सिद्ध झालं आहे. या सिनेमाचा विषय कस्टोडीयल डेथवर आधारित आहे, पण एका निराधार आईने आपल्या मुलावर झालेल्या अन्यायाविरोधात १३ वर्षे इतका प्रदीर्घ काळ लढा दिला हे यातील वेगळेपण आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहिल्यावर बऱ्याच माता आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुढे सरसावतील. एका स्त्रीने कोणाच्याही आधाराशिवाय दिलेला लढा अंतर्मंन हेलावून टाकणारा आहे. 'माई घाट'ला मिळणारे पुरस्कार आणि सिनेमावर होणारा कौतुकाचा वर्षाव भविष्यात अशा प्रकारचे आणखी सिनेमे बनवण्यासाठी प्रेरीत करणारा आहे.
उषा जाधवसोबत सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत, डॅा. गिरीश ओक, विभावरी जोशी आणि विवेक चाबूकस्वार आदी कलाकारांच्याही या सिनेमात विविध भूमिका आहेत. 'माई घाट' या सिनेमानं यापूर्वी 'सिंगापूर साऊथ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सात विभागांमध्ये सहा नामांकनं मिळवत 'बेस्ट फिल्म', 'बेस्ट एडिटींग', 'बेस्ट सिनेमॅटोग्राफी' या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. हाँग काँग अँड चायनाचे फिल्ममेकर आणि फेस्टिव्हल ऑथॉरिटी रीटी असलेल्या रॅाजर गार्सीया यांनीही 'माई घाट : क्राइम नं.103/2005' वर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'द एशियन पॅसिफीक स्क्रीन अॅवॅार्डस २०१९'च्या स्पर्धेसाठी या सिनेमाची अधिकृत निवड करण्यात आली होती. सिनेमॅटोग्राफर अल्फॅान्से रॅाय यांनी हा चित्रपट ६ - के फॅारमॅटवर शूट केला असून, पूर्णिमा ओक यांनी कॅास्च्युम डिझाईन केले आहेत. या सिनेमाला रोहित कुलकर्णी यांचं पार्श्वसंगीत लाभलं आहे.
No comments:
Post a Comment