Monday, 16 December 2019

'मेहफिल'मध्ये रंगली एक अनोखी 'सरगम'!!!!

आपल्या सर्वांच्या लाडक्या 'झी युवा' वाहिनीवर सोमवार ९ डिसेंबर पासून एक नवा कार्यक्रम सुरु झालेला आहे. 'युवा सिंगर एक नंबर'च्या घवघवीत यशानंतर, आणखी एक संगीत मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमाला स्पर्धेचे स्वरूप न देता, रसिकांना संगीताचा निखळ आस्वाद घेता येईल याची काळजी घेण्यात आली आहे. सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० ते १०.३० या वेळात ही 'मेहफिल' प्रेक्षकांना अनुभवता येईल. संगीत क्षेत्रातील विविध कलाकार, या कार्यक्रमात त्यांची कला सादर करताना दिसतील. दर आठवड्याला एक नवी थीम आणि एक नवा सेलिब्रिटी घेऊन 'मेहफिल' तुमच्या भेटीला येणार आहे. या कलाकारांसह मनमोकळ्या गप्पा सुद्धा रंगतील आणि त्यांची कला लाईव्ह पाहण्याची संधी उपस्थित प्रेक्षकांना मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात, साधना सरगम यांची उपस्थिती 'मेहफिल'ला लाभली होती.
नव्वदच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या आवाजाने गाजवणाऱ्या प्रसिद्ध गायिका साधना सरगम यांच्याबरोबर सुमधुर गाण्यांची आणि गप्पांची ही 'मेहफिल' रंगली होती. कार्यक्रमाची सूत्रसंचालिका क्रांती रेडकर हिने या गप्पांमध्ये आपल्या खास शैलीतून रंग भरले. साधनाजींच्या 'सात समंदर पार' या सर्वश्रुत आणि खुमासदार गाण्यावर क्रांतीने आपल्या नृत्याची झलक सुद्धा दाखवली. प्रेक्षकांसाठी ही मेहफिल म्हणजे फार मोठी पर्वणी ठरली आहे. साधना सरगम यांच्या बरोबरीने, राहुल सक्सेना, जुईली जोगळेकर आणि सावनी रवींद्र, आलोक काटदरे, उमेश मोहिते या गोड गळ्याच्या तरुण गायकांनी सुद्धा आपली गाणी सादर केली. प्रेक्षकांना 'मेहफिल'चा हा पहिला आठवडा खूपच आवडला आहे. संगीताच्या एका नव्या पर्वाला या 'मेहफिल'मुळे सुरुवात झाली आहे. पहिल्या आठवड्यातच प्रेक्षकांच्या मनात घर केलेली ही मेहफिल आता दर आठवड्यातील सोमवारी आणि मंगळवारी आपल्या भेटीला येणार आहे.
तेव्हा पाहायला विसरू नका, 'मेहफिल', 'झी युवा'वर दर सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९.३० वाजता!!!

No comments:

Post a Comment