बंदिशाला या चित्रपटात जिने ठसकेबाज लावणी सादर केली, ती नृत्यांगना 'कृतिका गायकवाड' आता 'झी युवा' वाहिनीवरील 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावर आपल्या नृत्याचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्याशी याविषयी गप्पा मारल्या असता, ती म्हणाली;
१. पहिल्या परफॉर्मन्ससाठी तू कुठला नृत्यप्रकार आणि गाणं निवडणार आहेस?
'तू ही रे' चित्रपटातील, 'गुलाबाची कळी' या गाण्यावर मी माझा पहिला परफॉर्मन्स देणार आहे. 'बॉलीवूड स्टाईल'ने हे सादरीकरण मी करणार आहे. ही माझी आवडती शैली आहे, आणि त्यामुळेच मला डान्स करणे सोपे सुद्धा जाईल. बंदिशाला सिनेमातील वैशाली आणि अमितराजच्या एका गाण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याच गाण्यावर पहिला परफॉर्मन्स असल्याचा मला खूप आनंद वाटतो आहे.
२. किती कालावधीनंतर तू पुन्हा एकदा नृत्य सादरीकरण करणार आहेस? पुन्हा नृत्याच्या मंचावर येण्याची आतुरता किंवा काही विशिष्ट भावना मनात आहे का?
विविध चित्रपटांमध्ये मी अनेक गाण्यांवर शूट केलेलं आहे. फुलवा खामकरने कोरिओग्राफ केलेल्या एका गाण्यात मी मयुरेश पेमसोबत सुद्धा काम केलेलं आहे. अर्थात, चित्रपटातील गाण्याचं चित्रीकरण व प्रेक्षकांची उपस्थिती असताना करण्यात येणारा परफॉर्मन्स यात खूपच फरक असतो. मंचावर, लाईव्ह परफॉर्मन्स करण्याचा माझा अनुभव मात्र बराच आधी घेतलेला आहे. हे आव्हान पेलण्याची संधी मिळणं, हे माझं मोठं भाग्य आहे. इथल्या मोठ्या मंचावर हे नवं आव्हान माझ्यासमोर असल्याने आनंद सुद्धा झालेला आहे. एक स्पर्धक असल्याने इतरांशी स्पर्धा असली, तरीही माझी पहिली स्पर्धा स्वतःशी असेल. माझ्यात अधिकाधिक सुधारणा व्हावी असा माझा प्रयत्न असेल.
३. सोनाली आणि मयूर या दोघांपैकी, तुझा अधिक लाडका परीक्षक नक्की कोण आहे?
दोघेही माझ्यासाठी खूप लाडके आहेत. पण, एक भावनिक किस्सा मी नक्की सांगेन. मयूर सरांनी मला माझ्या दुसऱ्या सादरीकरणानंतर त्यांचे घुंगरू भेट म्हणून दिले. पंडित बिरजू महाराज यांच्याकडून त्यांना मिळालेले हे घुंगरू, त्यांनी मला भेट म्हणून दिले, हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा क्षण ठरलाय, हे मात्र नक्की!!
४. 'युवा डान्सिंग क्वीन' या दमदार स्पर्धेमधील, तुझी सगळ्यात आवडती स्पर्धक कोण आहे?
आयुषी.
५. एवढ्या मोठ्या मंचावर तुला परफॉर्मन्स द्यायचा आहे. याची तुझ्या मनात काही धाकधूक आहे का?
नृत्य सादर करताना, कधी कधी मनात भीती, धाकधूक ही असतेच. तर, कधीतरी मी अगदीच दिलखुलासपणे माझा डान्स परफॉर्म करते. त्यामुळे मनात भीती किंवा धाकधूक आहे अथवा नाही, असं काही स्पष्टपणे सांगता येणार नाही. त्या त्या दिवशीचा अनुभव निराळा असेल.
६. तुझ्या डान्स रिहर्सल दरम्यान होणाऱ्या गमतीजमती आणि तुझ्या कोरिओग्राफरबद्दल आम्हाला थोडंसं सांग.
उत्तमरित्या नृत्य सादर करण्याचा विचार आम्हा सर्व स्पर्धकांच्या मनात आहे. त्यामुळे, त्याचा मानसिक तणाव व दबाव असणं साहजिक आहे. पण, आम्ही रिहर्सलदरम्यान वातावरण हलकंफुलकं ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. पूर्वा आणि नेहाचा यात मोठा सहभाग असतो. हसतखेळत, एकमेकांची थट्टामस्करी करत आम्ही नृत्याची तयारी सुद्धा करत असतो.
No comments:
Post a Comment