‘याराना’ सिनेमातील ‘ सारा जमाना हसींनो का दिवाना ’ हे गाणं ऐकल्यावर लगेच पाय थिरकायला लागतात आणि त्याचवेळी डोळ्यांसमोर उभा राहतो या गाण्यातील अमिताभ बच्चन यांचा गेट अप. आता मराठी प्रेक्षकांना हा गेट अप नव्याने आठवेल कारण गेल्या वर्षी गणरायाचे आगमन झाल्यावर अभिनेते विक्रम गोखले यांच्या ‘एबी आणि सीडी’ या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्या पोस्टरमध्ये विक्रम गोखले यांनी अमिताभजींच्या स्टाईलचा गेट अप केला होता आणि ‘चंदू मी आलो ’ असं वाक्य त्या पोस्टरसह अधोरेखित करण्यात आले होते.
अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित आणि पीव्हीआर प्रदर्शित ‘एबी आणि सीडी’चे पहिले पोस्टर लालबागच्या राजाच्या चरणी प्रदर्शित करण्यात आले होते.
औरंगाबाद येथील आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या 'औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२०' मध्ये मिलिंद लेले दिग्दर्शित 'एबी आणि सीडी' या सिनेमाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या नवीन पोस्टरमधून विक्रम गोखले आणि बिग बी यांच्या भूमिकेची आणखी एक नवीन झलक पाहायला तर मिळतेच पण त्याचसोबत सिनेमाची प्रदर्शित तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर घडणारी आनंदी घटना आणि त्याचे सेलिब्रेशन या एका ओळीमुळे सिनेमाची उत्सुकता वाढते. नेमकी ती आनंदी घटना कोणती आणि सेलिब्रेशनविषयी तपशिलात लवकरच कळेल कारण ‘एबी आणि सीडी’ येत्या १३ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
या सिनेमात अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांच्या लक्षवेधी भूमिका तर आहेतच पण सिनेमाच्या शिर्षकामध्येही त्यांचे सुंदर कनेक्शन आहे. आणि ते कनेक्शन असे की ‘एबी’ म्हणजे अमिताभ बच्चन आणि ‘सीडी’ म्हणजे चंद्रकांत देशपांडे. दोन कलाकारांची ऑन स्क्रिन मैत्री येत्या १३ मार्चला पाहायला मिळणार आहे. या सिनेमात सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.
अमिताभजींना ब-याच वर्षांनी मराठी सिनेमात पाहण्यासाठी आणि कौटुंबिक पण तितकीच मजेदार गोष्ट अनुभवण्यासाठी ‘एबी आणि सीडी’ तुम्हांला भेटायला येत आहेत १३ मार्चला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात.
No comments:
Post a Comment