Wednesday 5 February 2020

शनिवारी पार्लेकरांसाठी "रोमँटिक सुरोंकी मैफिल"!


मुंबईत सध्या थंडीने आपलं गुलाबी आच्छादन पसरवलंय. खास प्रेमी युगुलांसाठी आणि कायम टवटवीत असणाऱ्या तरुणाईच्या भावभावनांची पोषक आणि विशेष म्हणता येईल! या दिवसांत साजरा होणारा 'व्हॅलेन्टाईन्स डे'चा माहोल दुग्दशर्करा योगच म्हणावा. प्रेमाची वेगवेगळी रूपे आपल्या अनेक चित्रपटांतील गीतांतून लोकप्रिय नव्या - जुन्या गायक संगीतकारांनी अजरामर करून ठेवली आहेत.  हा अनमोल ठेवा विले - पार्ले पूर्व येथील 'सूर-ताल कराओके क्लब'ने खास पार्लेकर संगीतप्रेमी रसिकांसाठी नव्या गायकांच्या मुखातून दर्दी रसिकांसाठी "रोमँटिक सुरोंकी मैफिल" सादर करण्याचे ठरविले असून गाजलेल्या दर्जेदार हिंदी चित्रपटांतील अजरामर रोमँटिक - संगीताची ही सुरेल ‘रोमँटिक सफर येत्या शनिवारी खास प्रेक्षकांना घडणार आहे.
आपल्या भारतीय चित्रपटांतील अभिजात संगीताचा वारसा जपला जावा यासाठी पार्ल्यातील 'सूर-ताल कराओके क्लब'ने विविध संगीत कार्यक्रमांची मोहीम आखत खास दर्दी संगीतप्रेमी रसिकांसाठी विविध बहारदार संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प सोडला असून त्यामार्फत विविध संगीतमय कार्यक्रम मुंबईत आयोजित केले जातात. याच शृंखलेतील "रोमँटिक सुरोंकी मैफिल" ही बहारदार संगीत मैफिल येत्या शनिवारी ८ फेब्रुवारी, विलेपार्ले येथील प्रसिद्ध साठे महाविद्यालयातील सभागृहात, सायंकाळी (५:३० ते ९:३० वाजता) आयोजित करून जुन्या जमान्यातील प्रतिभावंत कलावंतांच्या लोकप्रिय प्रेम गीतांना नव्याने सादर करून युवा पिढीला आकर्षित करण्याचा संकल्प सोडला आहे.
"रोमँटिक सुरोंकी मैफिल" या बहारदार कार्यक्रमात एकापेक्षा एक अवीट गोडीची हिंदी लोकप्रिय चित्रपट गीते नवोदित गायक गायिका सादर करणार असून सर्वांसाठी विनामुल्य असलेली ही मैफिल रसिकांचा आनंद द्विगुणित करील अशी खात्री आयोजकांना आहे.  

No comments:

Post a Comment