Thursday, 6 February 2020

अहिल्यादेवींचे कार्य महिला - तरुणींसाठी प्रेरणादायी! - मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्या एक आदर्श माता होत्या, कश्या प्रकारे उत्तम राज्य करावे हा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. त्यांच्याकडून आजच्या महिलांनी - तरुणींनी शिकण्यासारखं आहे.  त्यांच्या काळात महिला अशी जबाबदारी पेलू शकतील कि नाही अशी शंका उपस्थित केली जायची. अश्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी एक आदर्श समाजापुढे - देशापुढे ठेवला. ही  माहिती नव्या पिढीला झाली पाहिजे हा निर्णय निर्माते बाळासाहेव कर्णवर - पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी घेतला हि विशेष उल्लेखनीय बाब आहे. त्यांच्या या धाडसी प्रयत्नांचे मी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कौतुक करतो. त्यांच्या या चित्रपटातून आजच्या युवा पिढीला, महिलांना निश्चित मार्गदर्शन आणि दिशा मिळेल.
बाळासाहेव कर्णवर - पाटील यांच्या 'पुण्यश्लोक प्रॉडक्शन्स' निर्मित आणि दिलीप भोसले दिग्दर्शित "पुण्यश्लोक अहिल्यादेवी" या हिंदी - मराठी चित्रपटाच्या पोश्टरचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे, मा. आमदार सुनील तटकरे व कुमारी आदिती सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि भारतातील इतर राज्यांमध्ये सुरु होणार आहे. चित्रपटाच्या विषयाला अनुसरून कलाकारांची निवड लवकरच केली जाणार आहे. सध्या आम्ही चित्रपटाच्या पटकथेवर काम करीत असून २०२१ च्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षागृहात प्रदर्शित करण्याचा मानस ठेऊन चित्रपटाचे  नियोजन करीत असल्याचे निर्माते बाळासाहेव कर्णवर - पाटील यांनी सांगितले.
निर्मिती प्रक्रिया सुरु असलेला 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' व 'आभरान' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा अनुभव पाठीशी असलेल्या दिग्दर्शक दिलीप भोसले यांचा "पुण्यश्लोक अहिल्यादेवी" हा महत्वाकांक्षी चित्रपट असून या चित्रपटासाठी ते गेली ३ वर्ष संशोधन करीत आहेत. ते सांगतात, "फ्रान्सिस ओटीयन या एका फ़्रान्सच्या इतिहास प्रेमी संशोधकाने अहिल्यादेवींविषयी विपुल माहिती गोळा करून त्यांच्यावर साहित्य निर्मिती केली आहे. आपल्या देशातील हे वैभव विदेशात विविध माध्यमांद्वारे  जतन केले जाते. आपण या बाबतीत बऱ्याचअंशी मागे आहोत. हे कुठेतरी खटकत होते. आपल्या तरुण पिढीसाठी चित्रपटरूपात हे वैभव जतन करावे असा विचार जोर धरू लागला आणि त्यासाठी निर्माते बाळासाहेव कर्णवर - पाटील यांनी तात्काळ होकार दिला, त्यांच्या पाठबळामुळे आम्ही हे शिवधनुष्य पेलत आहोत. त्यात आज आम्हाला काही प्रमाणात यश आले आहे. लवकरात लवकर चित्रपटगृहात हा चित्रपट भारतातील प्रत्येक नागरिक पाहून त्याची पोचपावती देतील तेव्हाच आमच्या कष्टाचे चीज होईल" असा विश्वास दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी बोलून दाखवला.
हा चित्रपट हिंदी मराठी भाषांमध्ये तयार होत पुन्हा एकदा इतिहासातील आदर्शवत व्यक्तीवरील हा विषय कुतूहल तयार करीत असून अहिल्यादेवींची भूमिका कोण करणार याविषयीची विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.  

No comments:

Post a Comment