मुंबई, 27 ऑगस्ट, 2020: मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे यांना दीर्घकाळानंतर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल (केडीएएच) मधून सोडण्यात आले, तेव्हा कुटुंबासमवेत गणेशोत्सव साजरा करण्यासाठीचा हा त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण होता. ‘कोविड-19’चे निदान झाल्यानंतर, देवळे यांच्यावर उपचार सुरू असताना वयोमानामुळे व अनेक अवयवांमध्ये गुंतागुंत निर्माण झाल्याने आव्हाने उभी राहिली होती; तथापि डॉक्टरांच्या अथक परिश्रमांमुळे देवळे यांच्यावरील संकट टळले व ते बरे झाले. अतिदक्षता विभागामध्ये प्रवेश केल्यापासून बरे होईपर्यंतच्या त्यांच्या रुग्णालयातील 20 दिवसांच्या मुक्कामात त्यांच्यावर ‘व्हेंटिलेटर’चे आणि इतर प्रगत स्वरुपाचे उपचार करण्यात आले. त्यातून त्यांची बरे होण्याची उल्लेखनीय अशी प्रगती ही इतर रुग्णांना प्रेरणादायी ठरली, तसेच या उपचार पद्धतींतून आधुनिक वैद्यकीय सेवा आणि डॉक्टरांची बांधिलकी यांचाही हा एक पुरावा समोर आला.
जुलैच्या मध्यातच देवळे (वय 80 वर्षे) यांना थोडा खोकला आणि उच्च रक्तदाब या त्रासांवरील उपचारांसाठी ‘केडीएएच’मध्ये आणण्यात आले. त्यांना हलका ताप आणि श्वास घेण्यात अडचण येत असल्याचे तपासणीत आढळले. त्यांच्या ऑक्सिजनची पातळी तपासली गेली, ती अतिशय कमी होती. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. आणखी चाचण्या झाल्यावर त्यांना तीव्र स्वरुपाचा न्यूमोनिया झाल्याचे, तसेच ‘कोविड-19’ची लागण झाल्याचेही सिद्ध झाले. त्यांची प्रकृती अधिकच खालावली व त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आले. ‘केडीएएच’मधील न्यूरोसायन्स केंद्रातील कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. अन्नू अग्रवाल म्हणाल्या, “रुग्णाला दाखल करून घेताना असे दिसून आले, की केवळ त्याच्या फुफ्फुसांवरच नव्हे तर हृदयावरही परिणाम झाला आहे. रुग्ण काही काळ कोमात गेला. नंतर तो अर्धवट अवस्थेतच शुद्धीवर आला आणि गोंधळून गेला. त्याच्या कमजोर आरोग्यामुळे आणि आजाराच्या तीव्रतेमुळे, जवळजवळ तीन आठवड्यांपर्यंत त्याच्यावर एमआरआय करणे शक्य नव्हते. शेवटी जेव्हा आम्ही एमआरआय करू शकलो, तेव्हा अनेक लहान स्वरुपाचे स्ट्रोक्स आल्याचे आढळले. सार्स-कोव्ह-2 विषाणूचा मेंदूच्या पेशींवर परिणाम होऊ शकतो, हे यातून पुन्हा उघड झाले.”
‘कोविड-19’ हा प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करणारा श्वसनाचा रोग आहे. ताप, कोरडा खोकला, थकवा आणि स्नायू दुखणे ही याची सामान्य लक्षणे आहेत, तथापि हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि पचनसंस्था यांसह शरीराच्या इतर अवयवांच्या यंत्रणेवरदेखील या रोगाचे परिणाम होऊ शकतात. केडीएएच येथे ‘कोविड-19’ची लागण झालेल्या गंभीर अवस्थेतील 350 रूग्णांचा अभ्यास केला असता असे दिसून आले आहे, की त्यातील सुमारे 20 टक्के जणांना न्यूरोलॉजिकल समस्या आहेत आणि त्यापैकी 40 टक्के रुग्णांच्या न्यूरोलॉजिकल समस्या गंभीर झालेल्या आहेत. विशेषत: ज्यांना न्यूमोनिया झाला, त्यांच्याबाबत हे आढळून आले, तसेच 20 टक्के जण स्ट्रोक्समुळे ग्रस्त आहेत. काहींना सीझर्स आले व ते कोमातही गेले. मधुमेह नसलेल्या रुग्णांमध्येही रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करणारे हार्मोनल असंतुलन आढळून आले, तसेच थायरॉईडच्या हार्मोन्सचे प्रमाण बदलले. यातील काही रुग्णांना तीव्र स्वरुपाचा, नियंत्रित न होणारा, जीवघेणा ठरू शकणारा ताप आला.
न्यूरोलॉजिकल निष्कर्ष असलेले काही रूग्ण कोणतीही जोखीम नसलेले आणि वयाच्या विशीतील होते. त्यांना मेंदूचे तीव्र झटके आले. देवळे यांच्याप्रमाणेच या रुग्णांना अतिदक्षता विभागात प्रगत औषधोपचार देणे आवश्यक ठरले. लवकर रुग्णालयात दाखल केल्याने रुग्ण संपूर्णपणे बरे होण्याची शक्यता वाढत असते. ‘केडीएएच’मधील न्यूरोसायन्स केंद्रातील कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. अन्नू अग्रवाल पुढे म्हणाल्या, “ज्या रुग्णांमध्ये स्ट्रोक किंवा सीझर यांसारखी न्यूरोलॉजिकल लक्षणे आढळतात, अशा सर्व रूग्णांना कोविड-19 झाल्याची शंका येणे क्रमप्राप्त आहे. कोविड-19 चे लवकर निदान करणे महत्त्वपूर्ण आहे, जेणेकरुन रुग्णांना रासायनिक आणि मेकॅनिकल ‘क्लॉट बस्टर’सारखे प्रभावी उपचार वेळेवर देता येतील."
यापूर्वी कर्करोगातून वाचलेल्या आणि सध्या उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या महादेव देवळे यांचा जणू पुनर्जन्मच झाला आहे. सतत झोप येणे, सुस्तपणा येणे व मानसिक संभ्रम वाटणे ही प्राथमिक लक्षणे असलेल्या देवळे यांना प्रत्यक्षात ‘कोविड-19’ची लागण होऊन त्यात गुंतागुंत निर्माण झाली होती. त्याचा परिणाम त्यांची फुफ्फुसे, मेंदू व हृदय यां व इतर अवयवांवर झाला होता. देवळे यांच्यावर ‘कोविड-19’चे विविध स्वरुपाचे, तसेच स्ट्रोक, हृदयविकार यांचे उपचार करून ‘न्यूरो-रिहॅबिलिटेशन’ केल्याने त्यांच्या प्रकृतीत यशस्वी सुधारणा झाली.
No comments:
Post a Comment