श्रीगणेशाच्या आगमनाने सध्या सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. हा आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी गायक स्वरूप भालवणकर व गायिका वैशाली सामंत यांनी बाप्पासाठी ऍकापेला आराधनेची सुमधुर व्हिडीओ मेजवानी आणली आहे. ‘किती किती आनंद रे...झाला गणपती बाप्पा’ असे बोल असणाऱ्या या गाण्याची खासियत म्हणजे वाद्याविना वेगवेगळ्या प्रकारचे ८५ ध्वनी या ऍकापेला गाण्यात ऐकायला मिळणार आहेत. तसेच तोंडाने काढण्यात आलेल्या प्रसिद्ध नाशिक ढोलची रंगत या गाण्यात आहे. करोना सावटाच्या चिंतेचे काहूर सध्या सगळीकडे आहे. बाप्पाच्या आगमनाच्या आनंदासोबतच हे करोना महामारीचे हे विघ्नही दूर होईल असा आशावाद स्वरूप भालवणकर व्यक्त करतात. बाप्पाच्या आगमनाचा आनंद प्रत्येकाला घेता यावा यासाठी ही अनोखी ऍकापेला गाण्याची भेट आणली असल्याचे स्वरूप भालवणकर सांगतात.
‘स्वरशाईन स्टुडिओ’ आणि ‘अनेरा एण्टरटेन्मेन्ट क्वेस्ट कोवर्क्स प्रोडक्शन’ या संस्थेने या ऍकापेला गाण्याची निर्मिती केली आहे. स्मिता काबरा व मानवेल गायकवाड यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गाण्याला स्वरूप भालवणकर व वैशाली सामंत यांच्या सोबत स्मिता काबरा, सरीशा काबरा, वैष्णवी बोरुलकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीताची जबाबदारी स्वरूप भालवणकर, उमेश रावराणे यांनी सांभाळली असून मिक्सिंग व मास्टरिंग सायटस जोसेफ यांचे आहे. या गाण्याची संकल्पना स्मिता काबरा यांची आहे. अजिंक्य पाथ्रीकर व गौतम इंगळे यांनी याचे संकलन व दिग्दर्शन केले आहे. आनंद भालवणकर, प्रसाद शिंदे व रितेश काबरा यांचे विशेष सहकार्य या गाण्यासाठी लाभले आहे.
https://youtu.be/AedXQddCDY8
No comments:
Post a Comment