आज आपण उपभोगत असलेल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या अनेक हुतात्म्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. इतिहासाची पाने उलगडून पाहता अशा अनेक शूरवीरांचे देशप्रेम आणि त्यांचे समर्पण आपल्याला दिसून येते. ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांचा सहभाग मोलाचा राहिला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधींनी १९४२ मध्ये ब्रिटिशांविरूद्ध ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू केले. त्यावेळी त्यात लहानथोरांपासून अनेकांचा समावेश होता. नंदुरबारमधील १५ वर्षीय बालक्रांतिकारक 'शिरीषकुमार मेहता' यांनी देखील या चळवळीत हौतात्म्य पत्करले. त्यांच्या हौतात्म्याच्या स्मृती जागवणारा ‘शहीद शिरीषकुमार’ हा मराठी चित्रपट भावेश प्रोडक्शन्सतर्फे तयार केला जाणार आहे. या चित्रपटाची घोषणा शिरीषकुमार यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून नंदुरबार येथील ‘शहीद शिरीषकुमार स्मारक’ येथे नुकतीच करण्यात आली. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदुरबारचे भावेश पाटील करणार आहेत. दिग्दर्शक भावेश पाटील, निर्माती माधुरी वडाळकर, निर्मिती व्यवस्थापक विजय माळी, गिरीश सुर्यवंशी, निशिकांत वळवी, रामलाल मिश्रा यावेळी उपस्थित होते.
नंदुरबार मध्ये ९ सप्टेंबर १९४२ रोजी इंग्रजांना ‘चले जाव'चा आदेश देणारी प्रभात फेरी निघाली होती. या फेरीत शिरीषकुमार मेहता आणि त्यांच्या मित्रांनी सहभाग घेतला होता. 'वंदे मातरम्'चा नारा देत १५ वर्षीय 'शिरीषकुमार मेहता' सरकारच्या विरोधात मोर्चाचे नेतृत्व करत होते. पोलिसांच्या विरोधाला न जुमानता देशभक्तीने भारावलेल्या शिरीषकुमार यांनी ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’ सारख्या घोषणा चालूच ठेवल्या. शेवटी पोलिसांनी गोळीबार सुरु केला. या गोळीबारात शिरीषकुमार जागेवरच कोसळले, मात्र हातातला झेंडा त्यांनी अखेरपर्यंत सोडला नाही. त्यांच्यासोबत धनसुखलाल वणी, घनश्याम दास, शशिधर केतकर, लालदास शहा हे त्यांचे चारही मित्र शहीद झाले.
आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या देशभक्ताच्या समर्पणाची आठवण आजच्या पिढीला करून देण्यासाठी या ‘शहीद शिरीषकुमार’ चित्रपटाची धुरा हाती घेतल्याचे दिग्दर्शक भावेश पाटील सांगतात. या चित्रपटासाठी 'शिरीषकुमार मेहता' यांची बहिण अनुराधा ठाकोर व त्यांचे पती उमेश ठाकोर यांनी परवानगी देत योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे भावेश पाटील सांगतात.
No comments:
Post a Comment