Thursday 12 November 2020

‘शेमारू मराठीबाणा’ तर्फे दिवाळीत मनोरंजनाचा महाउत्सव


प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक वीकेंडला मनोरंजक चित्रपट

मुंबई, १२ नोव्हेंबर २०२०: भारतातील आघाडीचं ‘कंटेंट पॉवरहाऊस’ असलेल्या ‘शेमारू एन्टरटेन्मेंट’च्या ‘शेमारू मराठीबाणा’ या मराठी चित्रपट वाहिनीतर्फे दिवाळीनिमित्त “मनोरंजनाचा महाउत्सव” सादर करण्यात येणार आहे. यंदा दिवाळीतही प्रत्येकाला घरात राहणे भाग पडत असल्याने, प्रेक्षकांचे जास्त मनोरंजन करण्याच्या हेतूने ‘शेमारू मराठीबाणा’ तर्फे येत्या १४, १५ आणि १६ नोव्हेंबर, या तीन दिवसांत तीन चित्रपट लागोपाठ दाखविण्यात येणार आहेत. त्यायोगे प्रेक्षकांना घरातच बसून कुटुंबियांसमवेत चित्रपटांचा आनंद लुटता येईल व दिवाळीही साजरी करता येईल. स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे, रीमा लागू, मोहन जोशी आदींच्या भूमिका असलेले अनेक नावाजलेले व नवीन चित्रपट संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक वीकेंडला ‘शेमारू मराठीबाणा’वर दाखविले जात आहेत.

‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवर उच्च प्रतीचे मराठी चित्रपट प्रसारीत करून मराठी भाषिक प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करण्यात येते. कोणताही अविस्मरणीय प्रसंग असो वा सणासुदीचे दिवस, प्रेक्षकांना संपूर्ण कुटुंबासमवेत ते साजरे करता यावेत, असेच ‘शेमारू मराठीबाणा’ चे प्रयत्न असतात. त्यामुळे ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजन, भाऊबीज अशा महत्त्वांच्या दिवशी सलग काही चित्रपट सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे नियोजन या वाहिनीने केले आहे. विनोद, नाट्यमयता, प्रेमकथा अशी विविध सामग्री असलेले चित्रपट यावेऴी सादर केले जाणार आहेत.

येत्या १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता व पुन्हा सायंकाळी ६ वाजता ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ हा अतिशय नावाजलेला चित्रपट ‘शेमारू मराठीबाणा’वर प्रदर्शित होईल. या चित्रपटात एका दाम्पत्याची कथा नमूद करण्यात आली आहे. लग्नानंतर काहीच दिवसांत नात्यात दुरावा निर्माण होऊन त्यांच्यातील प्रणय कसा संपुष्टात येतो आणि त्यावर उपाय म्हणून हे दाम्पत्य काय करते, याचे अतिशय रोमांचक चित्रण या चित्रपटात आहे. स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे आणि सई ताम्हणकर यांनी या कलाकृतीत गहिरे रंग भरले आहेत. ‘व्हीआयपी गाढव’ या चित्रपटाचा वर्ल्ड टीव्ही प्रीमिअर १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ व सायंकाळी ६ वाजता सादर होईल. गंगाराम या माणसाचे मुरली नावाचे गाढव एका पशुसंवर्धन अधिकाऱ्याला जखमी अवस्थेत दिसते आणि त्यातून गंगाराम व त्याची पत्नी ही गावातील दोन साधी माणसे प्रसार माध्यमांच्या व राजकीय नेत्यांच्या नजरेत येतात. त्याची रंगतदार, विनोदी कथा यामध्ये आहे. भालचंद्र (भाऊ) कदम आणि शीतल अहिरराव यांनी यात पती-पत्नीची भूमिका केली आहे. अखेरीस, ‘होम स्वीट होम’ हा अतिशय साधी व मनाला भिडणारी कथा असलेला कौटुंबिक व लोकप्रिय चित्रपट सादर होणार आहे. दिवंगत अभिनेत्री रिमा लागू, मोहन जोशी व स्पृहा जोशी यांच्या भूमिका असलेला ‘होम स्वीट होम’ १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ व सायंकाळी ६ वाजता रसिकांसमोर येईल.

या दिवाळीच्या सणामध्ये प्रत्येकाने घरात राहायचे आहे, तसेच बाहेरही सामाजिक अंतर राखायचे आहे. या काळात आपल्या कुटुंबियांबरोबर राहून मौजमजा करण्याची, आवडते चित्रपट एकत्रित पाहण्याची, आणि चित्रपटांविषयीची त्यातील तरतूद ‘शेमारू मराठीबाणा’ ने केली आहे.

No comments:

Post a Comment