श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स प्रस्तुत, सुनिल राजाराम फडतरे निर्मित आणि तानाजी घाडगे दिग्दर्शित ‘बस्ता’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सायली संजीव, सुहास पळशीकर, शुभांगी गोखले, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव, प्राजक्ता हनमगर, सुरज पवार, अरबाज शेख, पल्लवी पाटील, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, योगेश शिरसाट आदी कलाकारांनी त्यांच्या सहज-सुंदर अभिनयाने कथेत रंगत आणली आहे.
या सिनेमाची कथा लग्नसोहळ्या भोवतीच फिरते पण यातून अधोरेखित होते वडील- मुलीचे नाते आणि मुलीच्या सुखासाठी शेतकरी वडीलांची चाललेली धडपड. सायली संजीवने यामध्ये ‘स्वाती’ नावाचं पात्रं साकारलं आहे तर सुहास पळशीकर यांनी आळते गावचे कष्टाळू शेतकरी ‘नामदेवराव पवार’ हे पात्रं साकारलं आहे. स्वातीला नोकरदार नवरा पाहिजे असा नामदेवरावांनी ठरवलंय. काही स्थळं बघितल्यावर सरकारी नोकरीत कार्यरत असणा-या विकास चौधरीला (सुरज पवार) स्वातीने पसंत केलंय. मात्र लग्न थाटामाटात झालं पाहिजे हा मुलाच्या मंडळींचा हट्ट नामदेवराव यांनी केवळ आपली मुलगी सुखात राहिली पाहिजे या त्यांच्या स्वप्नाखातर पूर्ण करण्याचा शब्द देतात आणि त्यासाठी धडपडत असतात. लग्नाची बोलणी झाल्यावर लग्नाच्या कामाची सुरुवात बस्ता बांधण्यापासून होते... बस्त्यासाठी अनेक अडचणी येतात, काही मजेदार किस्से घडतात, भावूक क्षण अनुभवयाला मिळतात. मग संपूर्ण कथा ही बस्त्या भोवती फिरते आणि अखेरीस काय होतं हे तुम्हांला येत्या २९ जानेवारीला समजेलच.
अक्षय टांकसाळे आणि पार्थ भालेराव यांच्यातील जिगरी यारी देखील तुम्हांला आवडेल हे नक्की. सोबतीला सुंदर गाणी, तगडी स्टारकास्ट, विनोदी-मजेशीर डायलॉग्स प्रेक्षकांचे मनापासून मनोरंजन करतील याचा विचार सिनेमाच्या टीमने केला. त्यामुळे हा लग्नाचा ‘बस्ता’ सर्वांना अप्रतिम अनुभव देऊन जाईल यात शंकाच नाही.
अरविंद जगताप लिखित या सिनेमातील गाण्यांचे गीतलेखन मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी केले आहे तर, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. एका लग्नाच्या बस्त्यानिमित्त घडणारी गोष्ट ‘बस्ता’ हा सिनेमाच तुम्हांला सांगेल त्यामुळे नक्की पाहा हा नवा कोरा सिनेमा २९ जानेवारीपासून फक्त झीप्लेक्सवर.
Youtube Link ;- https://www.youtube.com/ watch?v=alWXPnVPWcc&feature= youtu.be
No comments:
Post a Comment