Monday, 22 March 2021

Zee Yuva - Almost Suphal Sampurn

 इरावती देशपांडे नंतर ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेत होणार नचिकेतच्या वडिलांची एंट्री

झी युवा वाहिनी वरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेमधले नचिकेत आणि सई चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. एकीकडे नचिकेत आणि सई यांच्यातलं प्रेम आणि दुसरीकडे अप्पांचा फॉरेन रिटर्न नचिकेतला असलेला विरोध, नचिकेतची आई आणि सई मधील मतभेत, अप्पा आणि नचिकेतमधल्या नात्यांचे हे चढ उतार तसंच अप्पा आणि नचिकेतच्या आई मधील वाद पाहण्यामध्ये प्रेक्षक चांगलेच गुंतलेत.
नचिकेतच्या आईला इम्प्रेस करण्यासाठी सई आणि अप्पांचं मन जिंकण्यासाठी नचिकेत खूप प्रयत्न करतात पण शेवटी दोघांचाही नकार मात्र कायमच आहे. आता नाईलाज असलेले सई नचिकेत आपापल्या घरच्यांना २४ तासांची मुदत देतात. या २४ तासात जर अप्पा आणि नचिकेतच्या आईने नचिकेत आणि सईच नातं मान्य करून त्यांच्या लग्नाला परवानगी नाही दिली तर ते दोघं कोर्टात जाऊन लग्न करतील अशी चेतावणी नचिकेत त्यांना देतो. पण हार मानतील ते अप्पा कसले? अप्पा आणि इरा मिळून नचिकेत आणि सईच लग्न मोडण्याचा डाव आखत आहेत. त्यांनी कोर्टात जाऊन लग्न करू नये म्हणून अप्पा आणि इरा, सई आणि नचिकेतच नातं त्यांना मान्य असल्याचं सगळ्यांसमोर खोटं बोलतात. हे खोटं बोलून ते सई आणि नचिकेतला कोर्टात जाऊन लग्न करण्यापासून थांबवून त्यांच्यात भांडण लावून त्यांचं नातं कसं तोडता येईल याचं प्लॅनिंग करतात आहेत. त्यांचा प्लॅन काही प्रमाणात यशस्वी देखील होतो पण सई आणि नचिकेत यांचं प्रेम खरं असल्यामुळे ते या सगळ्या अडचणींपासून दूर जाण्यासाठी घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतात. पण हा निर्णय काही छोटा नाही त्यामुळे घर सोडल्यानंतर त्यांच्यापुढे नवीन संकट उभी राहणार हे मात्र नक्की. रस्त्यावरून चालत असताना एक भुरटा चोर सईची बॅग हिसकावून पळून जातो. पण सई नचिकेतच्या मदतीला एक इसम सज्ज होतो आणि तो इसम दुसरा तिसरा कोणी नाही तर रवी देशपांडे आहे. रवी देशपांडे म्हणजे नचिकेतच्या वडील जे आता ऑस्ट्रेलियावरून इकडे आले आहेत. नचिकेतच्या आईच्या एंट्री नंतर मालिकेत अनेक ट्विस्ट्स आले आणि आता वडिलांच्या एंट्री नंतर देखील धमाका होणार यात शंकाच नाही. रवी देशपांडेची व्यक्तिरेखा अभिनेता अनिरुद्ध हरीप साकारणार आहेत. नचिकेतचे वडील त्या दोघांची साथ देतील कि ते देखील त्यांच्या प्रेमाला नकार देतील? आता मालिका कुठलं रंजक वळण घेणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.  

No comments:

Post a Comment