उत्तर प्रदेशमधील सहाव्या ‘के आसिफ - चंबळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ २०२२ मध्ये निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित-दिग्दर्शित 'बनी' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर टॉर्टुगा मोशन पिक्चर्स' निर्मित आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे दिग्दर्शित "मोऱ्या" या चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट कथा, अभिनय आणि दिग्दर्शन अश्या महत्वाच्या पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.
भारतातील ‘के आसिफ - चंबळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ जाणकार रसिकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी होत आहे. गेली सहा वर्षे हा महोत्सव उत्तर प्रदेशातील प्रख्यात लेखक दिग्दर्शक आणि निर्माते के. असिफ यांच्या नावे हा महोत्सव त्यांच्या जन्मभूमीत आयोजित करण्यात येतो. जगभरातील विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी यानिमित्ताने येथील दर्दी रसिकांसाठी पर्वणी ठरत आहे.
'बनी'चा फर्स्टलूक 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'इंडिया पॅव्हेलियन'मध्ये करण्यात आला, आणि त्यानंतर विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये 'बनी'च्या प्रवेशिका सादर करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. ढाका येथील प्रसिद्ध 'सिनेमेकिंग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' निवड झाल्यानंतर स्पेन येथील जगप्रसिद्ध 'माद्रिद' आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी या चित्रपटाची निवड झाली. त्यापाठोपाठ अमेरिकेतील 'फोर्ट स्मिथ’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव', पाकिस्तानातील ‘गंधार इंडिपेंडेंट’ चित्रपट महोत्सव, तसेच फरीझाबाद येथील ‘अयोध्या’ चित्रपट महोत्सवासाठी 'बनी'ची निवड झाली आहे. बनीच्या शीर्षक भूमिकेत बालकलाकार सान्वी राजे सोबत शैलेश कोरडे व शीतल गायकवाड या कसदार कलाकारांनी प्रमुख भूमिका समरसून निभावली आहे.
'शहराचा रोज घाण होणारा चेहरा जीवावर उदार होऊन, कोणत्याही मुलभूत सोई - सुविधांविना आपलं आरोग्य पणाला लावून नरकयातना भोगत गल्ल्या-गटारांची साफसफाई करणाऱ्या सिताराम जेधे उर्फ ‘मोऱ्या’ची हृदयस्पर्शी कथा' "मोऱ्या" या चित्रपटातून रेखाटण्यात आली आहे. लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता अशी त्रिसूत्री सांभाळणाऱ्या जितेंद्र पुंडलिक बर्डे यांची ही पहिलीच कलाकृती असून 'ढाका येथील 'सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’-(CIFF) सोबत, ‘लव्ह & होप आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ बार्सिलोना मध्ये निवडला गेला आहे. या चित्रपटाच्या टीझरचे प्रदर्शन 'कान्स महोत्सवात' करण्यात आले होते, तेव्हाच चित्रपटाचा टिझर पाहून अनेक चित्रपट रसिक - समीक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.
भारतातील एका महान चित्रपट कलावंताच्या नावे हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ असल्याने हे पुरस्कार आमच्याकरिता विशेष महत्वाचे असल्याचे ‘बनी’चे निर्माते शंकर धुरी आणि ‘मोऱ्या’चे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता जितेंद्र पुंडलिक बर्डे यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment