Friday 16 August 2019

स्टारकिड्सना सुद्धा नाव कमावण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो - अभिनय बेर्डे

त्याच्या पदार्पणातूनच प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनय बेर्डे रंपाट चित्रपटात भाव खाऊन गेला. येत्या रविवारी या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर प्रसारित होणार आहे. त्याच्या याच चित्रपट आणि त्यातील त्याच्या भूमिकेबद्दल साधलेला हा खास संवाद
१. चित्रपटातील पात्र आणि अभिनय, यांच्यात काही साम्य आहे का?
मिथुन अगदीच फिल्मी आहे. तसाच मी देखील एकदम फिल्मी आहे हे मी नक्कीच सांगेन. आपल्या मुलाने एक मोठा स्टार व्हावं, असं स्वप्न मिथुनच्या आईने पाहिलं, तसंच ते माझी आई सुद्धा नेहमीच पाहत आली आहे. मिथुन आणि अभिनय यांची पार्श्वभूमी वेगळी असली, तरीही त्याचा खोडसाळपणा, मस्तीखोर वृत्ती, या सगळ्या गोष्टी मी माझ्या आयुष्यात सुद्धा करत आलोय. हे आमच्यातील साधर्म्य आहे, असं मी म्हणेन. 
२. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा असण्याचा, सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी काही फायदा किंवा तोटा झाला का?
'स्टारकिड' असलेल्या प्रत्येकच कलाकाराला हा प्रश्न विचारला जातो. पदार्पण करणं आम्हाला थोडं सोपं जातं, हे जरी खरं असलं तरीही आपली ओळख निर्माण करण्यासाठी करावी लागणारी धडपड, त्यासाठी करावी लागणारी मेहनत ही सगळ्यांसाठी सारखीच असते. अर्थात, आमच्यावर अपेक्षांचं ओझं थोडं जास्त असतं. त्या अपेक्षा आहेत यांचं भान ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे आम्हाला सुद्धा नाव कमावण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. 
३. दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासोबत काम करण्याचा तुझा पहिलाच अनुभव होता. त्याविषयी काय सांगशील?
रवी सरांसोबत काम करण्याचं माझं एक स्वप्न होतं. माझ्या 'बकेट लिस्ट'मधील एक गोष्ट यामुळे पूर्ण झाली आहे. नटरंग, बालकपालक, टाईमपास सारखे दर्जेदार चित्रपट त्यांनी याआधी दिग्दर्शित केले आहेत. त्यांचं काम मला खूप आवडतं. म्हणूनच मला त्यांच्यासोबत काम करण्याची मनापासून इच्छा होती. त्यामुळे 'रंपाट' सिनेमाचा हा अनुभव माझ्यासाठी स्वप्नपूर्ती करणारा ठरला.
४. 'रंपाट' या चित्रपटाच्या निमित्ताने आईसोबत तू पहिल्यांदाच काम केलंस. हा अनुभव कसा होता?
आईसोबत काम करायची संधी याआधी अनेकदा चालून आली होती. पण, करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला आईसोबत काम करायचं नव्हतं. स्वतःची अशी एक ओळख निर्माण करून, सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवण्याची माझी इच्छा होती. पण, असं असूनही, मी रवी सरांना नाही म्हणू शकलो नाही. 'काळूबाई'ची भूमिका आईसाठी इतकी योग्य होती, की ती तिच्याचसाठी लिहिली गेली असावी. आईसोबत काम करायला अर्थातच खूप मजा आली. ती माझी आई आहे, तशीच खूप जवळची मैत्रीण आहे. तिच्याकडून खूप काही शिकायलाही मिळालं.
५. चित्रीकरणाच्या वेळी घडलेला एखादा अविस्मरणीय किस्सा कुठला आहे?
चित्रीकरणादरम्यान अनेक मजेदार किस्से घडले. सांगलीतील एका गावातला किस्सा मला आठवतोय. गावातलं एक झाड आणि त्याच्या पारावर बसलेली माणसं तिथे होती. रवी सरांनी तिथे गाणी लावली व मला मनमुरादपणे नाचायला सांगितलं. हृतिक रोशनपासून ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत ज्यांच्या नृत्याच्या स्टेप्स मला आठवत होत्या, त्या मी करत होतो. दीड-दोनशे गावकऱ्यांचा घोळका तिथे जमला होता. यावेळी लोकांनी माझं खूप कौतुक केलं. मला इतकं कौतुक अपेक्षित नव्हतं, त्यामुळे तो आनंदाचा क्षण होता.
माझी एन्ट्री सायकलवरून होती. ती सजवलेली सायकल, स्लोमोशनमध्ये चित्रित केला जाणारा प्रसंग, अशी एन्ट्री माझ्यासाठी नवीन होती. त्यामुळे, तीदेखील एक अविस्मरणीय आठवण आहे. 

No comments:

Post a Comment