'जयमल्हार'मधून पौराणिक भूमिकेत दिसलेला रांगडा अभिनेता, देवदत्त नागे आता 'झी युवा' वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेत डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. ही नवी मालिका, १२ फेब्रुवारीपासून, सोमवार ते शनिवार, रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे. याविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा;
१. 'झी युवा'सोबत तू आता काम करत आहेस? तुझ्या मनात नेमक्या काय भावना आहेत?
'झी युवा'सोबत काम करणं, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. 'झी मराठी'वरील जय मल्हारमुळे मला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे 'झी'सोबत असलेलं नातं खूपच छान आहे. हे ऋणानुबंध माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. 'झी युवा'चे याआधीचे कार्यक्रम सुद्धा खूप छान होते. मला सुद्धा असंच एखादं छान काम करण्याची संधी मिळावी असं वाटत होतं, जी 'झी युवा'च्या निमित्ताने आज मला ही संधी मिळाली आहे
२. 'झी युवा'वरील या नव्या कार्यक्रमाविषयी आम्हाला सांग.
देवा, हा एक इंटरनॅशनल डॉन आहे. ही कथा व मालिका त्याच्यावर आधारित आहे. देवाच्या मुलीला त्याने डॉन असणं आवडत नाही. ती एक मेडिकल स्टुडंट आहे. तिच्याशी दुरावा कमी व्हावा, या हेतूने देवा स्वतः त्या कॉलेजात दाखल होतो.
चुकीच्या पद्धतीने अनेक व्ययसाय करत असला, तरीही देवा मनाचा सच्चा, प्रेमळ आणि लोकांचा विचार करणारा आहे. लोकांशी न्यायाने वागता यावं असा त्याचा प्रयत्न आहे. नावाला व कामाला डॉन असला, तरीही हा एक चांगला माणूस आहे. लोकांसाठी तो कशाप्रकारे काम करतो हे या मालिकेत पाहायला मिळेल.
ही मालिका इतर मालिकांहून निराळी आणि खास असणार आहे, कारण यात प्रेक्षकांना कधीही न पाहिलेली ना ऐकलेली एका डॉनची लवस्टोरी पाहायला मिळेल.
३. 'डॉक्टर डॉन' या कार्यक्रमामधील तुझ्या व्यक्तीरेखेविषयी काय सांगशील?
देवा ही इंटरनॅशनल डॉनची भूमिका मी साकारत आहे. हा आंतरराष्ट्रीय डॉन असल्याने त्याचे राहणीमान अत्यंत उच्च दर्जाचे आहे. छानछोकीने राहणे, महागड्या वस्तू व गाड्या वापरणे ही त्याची आवड आहे.
४. पौराणिक कथेतील भूमिका ते डॉनची भूमिका, असं वळण तुझ्या अभिनयाला मिळालेलं आहे. हा अनुभव कसा आहे?
पौराणिक कथांमध्ये काम करायचे झाले, तर देवदेवतांना ज्याप्रकारचा सुडौल शारीरिक बांधा हवा, तो माझ्याकडे आहे. त्यामुळे अशा भूमिकांसाठी मला विचारणा होते. पण, इतर प्रकारच्या अनेक भूमिका मी केल्या आहेत. त्या हिट सुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या भूमिका करण्याची मला सवय आहे. देवाच्या कृपेने मी एक रांगडा माणूस असल्याने डॉनच्या भूमिकेसाठी सुद्धा मी योग्य ठरलो आहे.
कुठल्याही प्रकारची भूमिका करायची, म्हणजे लोकांच्या भावना आणि त्यांच्या अपेक्षा यांना पुरं उतरावं लागतं. या भूमिकेला मी योग्य न्याय देईन, याची मला खात्री वाटते.
५. डॉक्टर डॉनमधील तुझ्या लुकबद्दल आम्हाला थोडंसं सांग.
मी आधी म्हणालो त्याप्रमाणे, देवाचा लुक रॉयल राहणीमानाला साजेसा आहे. लवकरच हा लुक कॉलेजच्या मुलांमध्ये प्रसिद्ध होईल, याविषयी मला खात्री वाटते.
६. डॉनची भूमिका करायची म्हणजे तुझी भाषा एका खास प्रकारची असणार हे नक्की. त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगशील का?
इंटरनॅशनल डॉन असल्याने त्याला अनेक देशातील भाषा येतात. असं असूनही, त्याची गावाकडची रांगडी भाषा अनेकवेळा त्याच्या बोलण्यात डोकावत असते. शिक्षण कमी असल्याने, त्याला वाचता न येण्याचा सुद्धा त्रास आहे. त्यामुळे यातही एक निराळी गम्मत असेल.
No comments:
Post a Comment