अभिनेता प्रथमेश परब याने त्याच्या अभिनयाने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच त्याचा डॉक्टर डॉक्टर हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला. झी टॉकीजवर लवकरच या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. त्या निमित्ताने प्रथमेश सोबत साधलेला हा खास संवाद
१. तुमच्या भूमिकेविषयी थोडक्यात सांगा.
- केशव उगले हे माझ्या या सिनेमातील भूमिकेचं नाव आहे. केशव हे बहुगुणी पात्र आहे. कोणा सोबत कसं वागायचं याची त्याला पूर्णपणे जाण आहे. आई-बाबांसमोर आणि शिक्षकांसमोर तो अगदी शांत असतो तर आपल्या मित्रांसोबत असताना अत्यंत खट्याळ आणि मस्तीखोर असतो. केशवच्या मामाची इच्छा आहे की त्याने डॉक्टर व्हावं. पण केशवला धमाल मस्ती करण्यातच जास्त रस आहे. पुष्कर जेव्हा केशवला कॉलेजमध्ये भेटतो त्यानंतर सिनेमाची रंगत अजूनच वाढत जाते.
२. पहिल्यांदाच प्रेक्षकांना प्रथमेश आणि पार्थ ही जोडी पाहायला मिळाली, तुमचा एकत्र काम करण्याचा अनुभव कसा होता?
- पार्थ हा अत्यंत गुणी कलाकार आहे. पार्थचा मी आधी पासुनच खूप मोठा फॅन आहे. किल्ला सिनेमाच्या वेळेस आमची भेट झाली होती तेव्हा एकत्र काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. जेव्हा डॉक्टर डॉक्टर सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली तेव्हा मला जाणवलं की पार्थ हा खूप उस्फुर्त कलाकार आहे. कामाची मजा घेऊन तो काम करतो. आम्ही शूटिंग करत असताना सेटवरचं वातावरण खूपच हलकं फुलकं होतं. सर्वजण खूप आनंदात होते. तुम्हा दोघांना बघून मला अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे आठवतात अशी कौतुकाची थाप सुद्धा एका गृहस्थांकडून मिळाली होती. पुढे अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम करण्याची आमची इच्छा आहे.
३. ट्रेलर पाहून प्रेक्षकांकडून काय प्रतिक्रिया मिळाली?
- ट्रेलर बघून प्रेक्षकांकडून खूप चांगली प्रतिक्रिया मिळाली होती. पार्थ आणि माझी जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. ट्रेलरला तूफान प्रतिसाद मिळाल्याने प्रेक्षकांना सिनेमा नक्की आवडणार याची खात्री आम्हाला होती.
४. तुम्ही ट्रेलरमध्ये स्त्रीवेषात देखील दिसलात, तो सिन चित्रीकरण करतानाचा अनुभव कसा होता ?
- ते सीन चित्रित करत असताना आम्हाला थोडं टेन्शन आलं होतं. आम्ही स्त्री वेशात कसे दिसू.? प्रेक्षकांना ते आवडेल का? असे अनेक प्रश्न आम्हाला पडले होते. हे सीन करताना आम्हाला खूप काळजी घ्यावी लागली. सेटवरती सगळेच खूप हसत होते. त्यामुळे आमचं दडपण कमी झालं. आम्हाला दोघांना हे सीन करताना खूप मजा आली.
५. हा चित्रपट मैत्रीवर भाष्य करतो, तुमच्या आयुष्यात मैत्रीचं महत्व किती आहे आणि तुमच्या मित्रांसोबतचा एखादा धमाल किस्सा सांगा.
- डॉक्टर डॉक्टर हा "खऱ्या" मैत्रीवर भाष्य करणारा सिनेमा आहे. माझ्या आयुष्यातही असेच मित्र आहेत. शाळेत असल्या पासूनचे माझे मित्र आहेत. आमच्या मध्ये अजूनही तेवढी घट्ट मैत्री आहे असंख्य किस्से आहेत त्यातला एक म्हणजे मी आणि माझे काही मित्र एकदा जेवायला अंधेरी वेस्टला गेलो होतो. मी आणि २ मित्र आम्ही रिक्षाने गेलो आणि २ मित्र बाईक वरती निघाले होते. अर्धा तास झाला तरी हे दोघे पोहोचले नव्हते. त्यांना विचारलं तेव्हा ते बोरिवली वेस्टला पोहोचले होते. गप्पा मारता मारता आम्ही इकडे कधी पोहोचलो आम्हाला कळालच नाही अस ते मला म्हणाले. तर असे माझे मित्र आहेत. जे गप्पा मारता मारता चुकीच्या ठिकाणी पोहोचतात आणि त्यांना कळत सुद्धा नाही.
६. हा चित्रपट आता झी टॉकीजवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, तुम्ही त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल?
- २०२० या भयंकर वर्षांच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलो आहोत आणि सरते शेवटी झी टॉकीज डॉक्टर डॉक्टर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सादर करून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देणार आहे. येत्या २७ डिसेंबर ला दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. या सिनेमातून आम्ही अनेक सामाजिक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा सिनेमा तुम्हाला खळखळून हसवेल सुद्धा आणि थोडसं रडवेल सुद्धा. २७ डिसेंबर रोजी सर्वांनी हा सिनेमा बघावा अशी विनंती मी सर्वांना करतो.
No comments:
Post a Comment