Tuesday, 1 June 2021

Zee Marathi | CHYD | Anita Date's transcript

 मनापासून या नव्या भूमिकेचा आनंद घेतेय - अनिता दाते

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री अनिता दाते ही ‘राधिका’च्या भूमिकेद्वारे महाराष्ट्रातील तमाम घराघरात पोहोचली. गृहिणी आणि वर्किंग वूमन असे दोन्ही पैलू असलेल्या या तिच्या  भूमिकेला प्रेक्षकांकडून दाद मिळाली. नुकतीच राधिका झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या निमित्ताने तिच्या सोबत साधलेला हा खास संवाद
१. 'राधिका' तुझ्या किती जवळची आहे?
राधिकाच्या भूमिकेनं मला खूप काही दिलं, अफाट लोकप्रियता मिळवून दिली. अनेकींचा संघर्ष तिच्यातून व्यक्त झाला. सर्वसामान्य रसिकांना आपलीशी वाटणाऱ्या राधिकाच्या भूमिकेत गृहिणींना आपलं सुख-दुःख दिसतं आणि या निमित्तानं माझा अनेकांशी संवाद घडला. त्यामुळे राधिका माझ्या खूप जवळची आहे आणि नेहमीच राहील.
२. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या सेटवर आपल्या लाडक्या राधिकाला पाहून प्रेक्षकांना सुखद धक्का मिळाला आहे, पण तुझ्या काय भावना आहेत? हि नवीन भूमिका साकारताना कसं वाटतंय?
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत माझ्या भूमिकेच्या वाट्याला विनोद नव्हता. सौमित्रनं केलेले विनोदही न कळणारी, फारशी विनोदबुद्धी नसणारी अशी ती दाखवली होती. सेटवर इतरांच्या तुलनेत तसे विनोदी प्रसंग नव्हतेच त्यामुळे आता इथं मनापासून या नव्या भूमिकेचा आनंद घेतेय.
३. चला हवा येऊ द्या च्या सेटवर विनोदी प्रहसन सादर करताना ‘राधिका’तून बाहेर पडण्याची संधी मिळाली का?
कलाकार म्हणून एका भूमिकेतून वा पठडीतून बाहेर पडत स्वतःला सतत तपासणं, सुधारणं आणि वैविध्यपूर्ण काम करत राहणं गरजेचं असतं. तेच सध्या अनुभवत आहे.
४. या पँडेमिकमध्ये तू एक कलाकार म्हणून काय मिस करतेय?
नाटकाचं प्रशिक्षण घेतलं आणि खूप वर्षं नाटक केलं. ते मिस करतेय किंवा लवकरच नाटकात दिसेन या बोलण्याला सध्या तरी अर्थ नाही. परिस्थिती पूर्ववत होऊन निर्माते पुन्हा उभे राहतील त्यानंतरच हे शक्य असल्याची जाणीव आहे. तोपर्यंत आहे ती परिस्थिती स्वीकारणं गरजेचं आहे.

No comments:

Post a Comment