पत्रकार मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत भरला सारेगमप लिटिल चॅम्प्सचा ऑनलाईन म्यूजिकल तास
सारेगमप म्हणजे सुरीली मैफिल आणि झी मराठीने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना या सुरील्या मैफिलीत गेली अनेक वर्ष दंग करून ठेवले आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम प्रेक्षकांचा खास आवडता आहे. या कार्यक्रमातील छोट्या गायकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि गेल्या पर्वातील पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड आणि प्रथमेश लघाटे यांनी संगीत क्षेत्रात उंच भरारी घेतली. सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या आधीच्या पर्वाला प्रेक्षकांचा मिळालेला भरगोस प्रतिसाद आणि कार्यक्रमाची लोकप्रियता पाहून झी मराठी तब्बल १२ वर्षांनी लिटिल चॅम्प्सच नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. इतकंच नव्हे तर प्रेक्षकांचे लाडके पंचरत्न या नवीन पर्वात या छोट्या गायक मित्रांचे ताई दादा म्हणजेच ज्युरीच्या भूमिकेत दिसतील.
या नवीन पर्वाच्या निमित्ताने नुकतीच या लिटिल चॅम्प्सची ऑनलाईन शाळा भरली होती, ज्यात पत्रकार मित्रांचा देखील सहभाग होता. या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून मृण्मयी देशपांडे हिने या पाचही पंचरत्नांच मनोगत विचारलं. पंचरत्नांनी या नवीन पर्वाबद्दल २ शब्द सांगितले. त्याचसोबत या कार्यक्रमाची झलक म्हणून काही खास गोड स्पर्धकांनी गाणी देखील गायली. मृण्मयी आणि पंचरत्नांनी शूटिंग दरम्यानचे काही खास किस्से देखील सांगितले.
असाच एक किस्सा सांगताना प्रथमेश लघाटे म्हणाला, "ही मुलं जरी लहान असली तरी स्पर्धेमध्ये ते एकमेकांच्या गाण्यांना तितकीच दाद देतात. एखाद्या स्पर्धकाचं गाणं छान झालं किंवा त्याला जास्त गुण मिळाले तर बाकीच्यांना वाईट वाटत नाही. उलट त्यांना आनंदच होतो."
तसंच या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडे म्हणाली, "मुळातच मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांना सांभाळणं अवघड असतं. त्यांना बोलतं करण्याचं, त्यांचा आत्मविश्वास कायम ठेवण्याचं, कधी एखाद्याच गाणं वाईट होऊ शकतं त्यावेळी त्यांना धीर देण्याचं आव्हान माझ्या समोर आहे. हे मला उत्तमरीत्या जमेल अशी आशा आहे."
२४ जून पासून गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तेव्हा पाहायला विसरून नका सारेगमप लिटिल चॅम्प्स फक्त आपल्या झी मराठीवर
No comments:
Post a Comment