'श्री क्षेत्र कडगं'ची या 'दत्तगुरू' संप्रदायातील ऐतिहासिक आणि अध्यात्मिक श्री क्षेत्राचा इतिहास उलगडणारे व अभूतपूर्व घटनांनी परिपूर्ण अश्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आज सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री डॉक्टर अनुराधा पौडवाल यांच्या शुभहस्ते त्यांच्या खार येथील निवास्थानी अत्यंत साधेपणाने करण्यात आले. याप्रसंगी श्री. शिवशरण अप्पाजी(अध्यक्ष श्री. सायंदेव दत्त ट्रस्ट समिती कडंगची), श्री. सुमंत आमशेकर (कोकण प्रांत प्रचारक), सौ. मंजिरी जोशी(लेखिका), श्री. प्रमोद जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या छोटेखानी कार्यक्रमाचे संयोजन संगीतकार अभिजित जोशी यांनी केले.
"कडगंची देवस्थानला भेट देणे हा माझ्या आयुष्यामध्ये मोठा आशीर्वादच ठरला आहे. श्री अप्पाजी यांची अखंड भक्ती, निःस्वार्थ सेवा प्रेरणादायी ठरत आहे. कडगंची हे गुरुचरित्राचे जन्मस्थान आहे, या स्थानाच्या दर्शनाने अध्यात्मिक स्पंदनांची अनुभूति येते. मी स्वामींच्या चरणी आशीर्वाद घेते" असे लोकप्रिय गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल म्हणाल्या.
सायंदेव हे श्रीनृसिंहसरस्वती यांचे पट्टशिष्य होते, श्रीनृसिंहसरस्वती हे श्री दत्तात्रय यांचे दुसरे अवतार तर श्रीपाद श्रीवल्लभ हे पहिला अवतार मानले जातात. श्री सायंदेव यांचे जन्मस्थान कडगंची, कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यात आहे. हे एक छोटंसं खेडेगाव असून दत्तात्रयांच्या स्थानांपैकी एक सर्वात महत्वाचे स्थान आहे. श्री सायंदेव यांचे शिष्य श्री सरस्वती गंगाधर यांनी येथे गुरुचरित्राची निर्मिती केली आणि आपल्या सर्वांना श्रीपाद श्रीवल्लभ यांची महती कळली. कडगंची असं स्थान आहे जे श्री सायंदेव यांच्या जन्मानं पवित्र, श्रीनृसिंहसरस्वती यांच्या स्पर्शानं पावन आणि श्री सरस्वती गंगाधर यांच्या ग्रंथानं पुण्यवान असल्याचे उद्गार श्री शिवशरण अप्पाजी मादगौंड यांनी याप्रसंगी काढले.
दत्त संप्रदाय हे समाजातील विविध भेद नष्ट करण्याचे महान कार्य करीत आले आहे. विविध जाती धर्मातील लोकांमध्ये एकता निर्माण करून समन्वय साधण्याचे कार्य हा संप्रदाय करीत आहे. तसेच जेव्हा आपल्या देशावर आक्रमणं होत होती आणि समाज विपन्न व निराशेत होता तेव्हा मानसिक आधार आणि समाजाचं अस्तित्व नर्मदेच्या दक्षिणेपलीकडे टिकविण्याचे कार्य श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांनी केले आहे. समाजाला एक शक्ती दत्तसंप्रदायातील महान महतींनी दिली आहे असे विशेष अतिथी राष्ट्रीय स्वयं सेवक संघ कोकण प्रांत प्रचारक श्री. सुमंत आमशेकर म्हणाले.
No comments:
Post a Comment