गोरेगाव, मुंबई (बातमीदार) : रुग्णांना विनामूल्य सेवा देणाऱ्या 'राजहंस प्रतिष्ठान' संस्थेचा यंदाचा ‘राजहंस पुरस्कार’ दिव्यांग सेवेत स्वतःला अर्पित करून दिव्यांगांचा विकास हाच आमचा ध्यास म्हणणाऱ्या 'नूतन गुळगुळे फाऊंडेशन'ला प्रमुख पाहुणे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या शुभहस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. फाऊंडेशनचे पुष्कर, विनायक, नूतन गुळगुळे यांसह अमरनाथ तेंडोलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी पुरस्कार्थींमध्ये जेष्ठ नाटककार चंद्रकांत कुलकर्णी, वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज कर्करोग विशेषज्ञ डॉ. राजेंद्र बडवे, भारतीय लष्करात अचाट शौर्य जागवणारे शौर्यचक्र पुरस्कार विजेते कमांडो मधुसूदन सुर्वे, राजहंसचे सुहास कबरे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
राजहंस प्रतिष्ठान कलासेवा आणि रुग्णसेवा या क्षेत्रांत गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. गरजू रुग्णांना विनामूल्य रुग्णसाहित्य पुरवणे, खेडोपाडी वैद्यकीय शिबिरे भरवणे, देहदान, नेत्रदान, त्वचादान आदीविषयी समाजात जागृती निर्माण करणे असे अनेक उपक्रम संस्थेतर्फे चालविले जातात. समाजाच्या विविध क्षेत्रांत समर्पित भावनेने काम करणाऱ्यांचा सन्मान दरवर्षी संस्थेतर्फे ‘राजहंस पुरस्कार’ देऊन केला जातो. यंदा या पुरस्कारासाठी या सामाजिक क्षेत्रात अभिनव कामगिरी करून आपला ठसा उताविणाऱ्या 'नूतन गुळगुळे फाऊंडेशन'ला सन्मानित केले तसेच त्यांच्या ‘स्वानंद सेवा सदन’ या कोरोनामुळे पालक गमावलेल्या ‘दिव्यांग’ बालकांकरिता आणि त्यांच्या एकल पालकांसाठीच्या भारतातील पहिले वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्राच्या उभारणी कार्यासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
या सोहळ्याच्या निमित्ताने गायिका मृदुला दाढे-जोशी व अन्य गायक हे अजरामर राहिलेल्या हिंदी व मराठी गाण्यांचे विश्लेषणासहित सादरीकरण करण्यात आले. या विशेष सोहळ्यासाठी, प्रशांत दळवी, जितेंद्र कुलकर्णी, गीतकार प्रसाद कुलकर्णी, डॉ. संजय दुधाट, माध्यमसल्लागार राम कोंडीलकर, विनोद धोंड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment