माझं आणि गो. नी. दांडेकर(अप्पांच्या) साहित्याचं नातंच वेगळं होतं - डॉ. वीणा देव
मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून मराठी वाचकांसाठी ज्ञानभांडार ठरणारी प्रख्यात साहित्यिक डॉ. वीणा देव यांची समग्र मुलाखत स्टोरीटेल मराठीचे प्रसाद मिरासदार आणि थिंक बॅंकचे विनायक पाचलग यांनी खास रसिक वाचकांसाठी घेतली आहे. या विशेष मुलाखतीत त्यांनी डॉ. देव यांना बोलतं करून अनेक दशकांचा इतिहास जागृत केला आहे.
डॉ. वीणा विजय देव या प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत. पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी मराठी विभागप्रमुख काम केले. तेथे त्यांनी ३२ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली. लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळले असून, या संदर्भातील त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "आपण जसे लोकांकडे जेवायला जातो तसे मी साहित्यिकांकडे अप्पांसोबत जात असे. संजीवनी मराठे, महादेवशास्त्री जोशी, पद्मा गोळे, द. मा. मिरासदार यांच्याशी गोनीदांचं फार जवळचं नातं होतं, ही मंडळी साहित्यिक असूनही किती साधी होती हे मला त्यांच्यामुळे समजले. अप्पांमुळे विविध कलांशी, साहित्याशी परिचय होऊन पुढे तेच माझं आयुष्य झालं".
त्यापुढे सांगतात, काही वर्षांपूर्वी एका दैनिकाने साहित्यासाठी 'एक अभिनव उपक्रम' 'सुरु केला होता, ते १०० पुस्तकांची यादी प्रकाशित करीत, जी आपण वाचायला हवीत. असे उपक्रम आज व्हायला हवेत. आज इतकं वाचायला आहे, कि त्यातलं नेमकं काय वाचायचं हे कळत नाही. लायब्ररीत जायचं, ते जे काही आपल्यासमोर ठेवणार त्यातून निवडायचं, लेखक कोण तेही माहित नसतं, त्यातून काही घ्यायचं, निवडायचं आणि वाचायचं या वाचनाचा वाङ्मय म्हणून काही संस्कार होतो, असं मला वाटत नाही. त्यामुळे ज्याला चांगलं वाचायचं आहे, त्याने सल्ला घ्यावा, अगदी तुमच्या शाळेतल्या शिक्षकांचा किंवा कॉलेजमध्यला प्राध्यापकांचा. आणि त्यांनी सांगितलेली काही पुस्तके वाचलीच पाहिजेत. म्हणजे तुम्हाला मराठी म्हणजे काय आणि ती किती संपन्न आहे ते समजेल.
मी स्टोरीटेलसाठी ९ पुस्तके केली आहेत. आणि ती ऐकल्याचे आता मला फोन येतात, त्यावरून असं समजतंय कि ज्यांना वाचण्याचा कंटाळा आहे. त्यांनी ऐकावं, त्याचा प्रभाव जास्त असतो. मुळात आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर इंग्रजीचे प्राधान्य आणि प्राबल्य राहिले त्यामुळे मराठी आणि प्रादेशिक भाषेकडील पुस्तकांकडे दुर्लक्ष झाले ते शिकवलेच गेले नाहीत. त्यामुळे आपली भाषा म्हणून आत्मीयता राहिली नाही. मराठी ज्ञानभाषा झाल्यास तिला नवी झिलई येईल.
No comments:
Post a Comment