Monday, 20 January 2020

'युवा डान्सिंग क्वीन'च्या निमित्ताने नाचू लागली अभिनेत्री गायत्री दातार!!

'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री गायत्री दातार, आता 'झी युवा' वाहिनीवरील 'युवा डान्सिंग क्वीन' या नृत्यस्पर्धेत दिसते आहे. अभिनय कलेचे उत्तम गुण असलेली गायत्री नृत्य शिकलेली नाही. या स्पर्धेच्या निमित्ताने डान्सचा भरपूर अनुभव घेणारी ही अभिनेत्री याविषयी बोलताना काय म्हणते ते जाणून घेऊया. 
१. सर्वप्रथम कुठलं नृत्य तू मंचावर सादर केलं होतंस?
'मला वेड लागले प्रेमाचे' या गाण्यावर मी माझे पहिले नृत्य केले आहे. मला डान्सबद्दल फार काहीही माहीत नाही. मी पहिल्यांदाच अशाप्रकारे सादरीकरण करत होते. मनात धाकधूक होतीच. पण, तरीही परफॉर्मन्स करत असताना खूप मजा आली.
२. 'युवा डान्सिंग क्वीन'च्या माध्यमातून किती कालावधीनंतर तू पुन्हा एकदा मंचावर नृत्य सादर केलंस?
'झी'च्या एका अवॉर्ड शोमध्ये मी एकदा ग्रुप डान्स केला होता. सगळ्या मालिकांच्या मुख्य पात्रांचा मिळून हा डान्स होता. तो एक अनुभव सोडला, तर मी 'युवा डान्सिंग क्वीन'च्या आधी कधीही मंचावर नृत्य सादर केलेले नाही. इतक्या मोठ्या मंचावर आणि तेदेखील पहिल्यांदाच नृत्य सादर करत असल्याने उत्सुकता आणि भीती अशी संमिश्र भावना मनात होती. 
३. तुझा लाडका परीक्षक कोण आहे?
मला खरंतर मयूर दादा आणि सोनाली ताई हे दोघेही आवडतात. तसं बघायला गेलं तर, कुठलीही कला सादर करत असताना, आपण ती प्रेक्षकांपर्यंत योग्यप्रकारे पोचवू शकत आहोत की नाही, या गोष्टीला अधिक महत्त्व असतं. त्यामुळे 'सगळ्यात मोठा आणि आवडता परीक्षक कोण?' या प्रश्नाचं उत्तर शोधायचं झालं, तर प्रेक्षक हा माझा सगळ्यात आवडता परीक्षक आहे असं मी म्हणेन. 
४. तुझा सर्वांत आवडता डान्सर कोण?
मी स्वतः नृत्यकला शिकलेली नसल्यामुळे, मला डान्सबद्दल फारसं काही ठाऊक नाही. पण, मला माधुरी दीक्षित खूपच आवडते. 
५. तुला 'स्टेज फिअर' आहे का?
मला लहानपणापासूनच 'स्टेज फिअर' नाही. मंचावर जाऊन अभिनय सादर करणं, मी लहानपणापासून करत आले आहे. पण, डान्सच्या बाबतीत स्थिती थोडी निराळी होती. मनात थोडी धाकधूक होती. अभिनयाच्या बाबतीत जेवढी सहजता माझ्याकडे आहे, तेवढा आत्मविश्वास नृत्याविषयी नसल्याने भीती वाटणं साहजिक होतं. 
६. तुझ्या रिहर्सलदरम्यानच्या गमतीजमती आम्हाला सांगशील का?
आम्ही कुणीही एकमेकांना याआधी फार ओळखत नव्हतो. पण, 'युवा डान्सिंग क्वीन'च्या निमित्ताने आमची सगळ्यांची छान मैत्री झालेली आहे. एकमेकांना मदत करणे, काळजी घेणं, या गोष्टी ऑफस्क्रीन सुद्धा घडत असतात. थट्टामस्करी, चिडवाचिडवी, मजामस्ती हा सगळा सुद्धा या मांचावरील नेहमीचा भाग झालेला आहे.
ओंकार हा नृत्यामधील एक अत्यंत उत्तम गुरू आहे. त्याची टीम सुद्धा फार छान आहे. सगळ्यांकडून उत्तमरित्या रिहर्सल करून घेण्याचं काम ते करत असतात. एकूणच, भरपूर धमाल असलेल्या वातावरणात आमची ही स्पर्धा सुरू आहे. 

No comments:

Post a Comment