Saturday 25 January 2020

Zee Talkies | World Television Premier Triple Seat | Ankush Chaudhari transcript


चॉकलेट हिरो अंकुश आणि त्याची ट्रिपल सीट!!! 
मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट हिरो, अंकुश चौधरी हा सगळ्यांचाच लाडका आहे. त्याचा महिला चाहतावर्ग सुद्धा खूप मोठा आहे. ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन सुद्धा त्याच्यावर भाळणाऱ्या अनेकजणी पाहायला मिळतात. 'ट्रिपल सीट' या सिनेमात सुद्धा अंकुशवर अशीच काहीशी वेळ आलेली पाहायला मिळते. 'झी टॉकीज'वर 'ट्रिपल सीट' या सिनेमाचा 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' होणार आहे, त्यानिमित्ताने अंकुशसोबत खास गप्पा मारण्यात आल्या.
१. 'ट्रिपल सीट'मधील तुझ्या भूमिकेविषयी आम्हाला सांग. त्यासाठी तू नेमकी कशी तयारी केलीस?
ट्रिपल सीट या नावातच एक गम्मत आहे. सिनेमाचं नाव ट्रिपल सीट ठेवण्यामागे सुद्धा एक कारण होतं. डबल सीट असेपर्यंत दोघेही आरामात आणि नीट बसलेले असतात, पण तिसऱ्या व्यक्तीला जागा दिली गेली, तर त्यांच्यातील कुणीही आरामदायी पद्धतीने बसू शकत नाही. अशी परिस्थिती आयुष्यात निर्माण झाली तर काय होईल, यावर आधिरीत सिनेमा म्हणजे ट्रिपल सीट!
एका सामान्य घरातील मुलाची भूमिका मी यात साकारली आहे. थोडा कमी शिकलेला असला, तरीही तो खूप संस्कारी आहे. सगळ्यांची काळजी घेणारा आणि समंजस आहे. थोडासा भोळा सुद्धा आहे. कुणीही त्याला सहज फसवू शकतं. असाच एकदिवस त्याला एक मिसकॉल येतो आणि त्यामुळे त्याचं आयुष्य कसं बदलून जातं, ते या चित्रपटात पाहायला मिळेल. 
२. 'कृष्णा' ही भूमिका साकारणं तुझ्यासाठी किती आव्हानात्मक ठरलं?
याआधी मी ज्याप्रकारच्या भूमिका केल्या आहेत, त्याहून वेगळं काहीतरी करणं, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान होतं. मी निवडलेली कथा सुद्धा आधी होती, की ज्याप्रकारचा चित्रपट मी आधी केलेला नाही. कथा उत्तम असेल, तर मराठी प्रेक्षकवर्ग सिनेमागृहात गर्दी करतो, वेळात वेळ काढून टीव्हीवर सुद्धा सिनेमा आवर्जून बघतो. याआधी मी केलेल्या भूमिकांची छाप पुसून टाकून मला कृष्णा साकारायचा होता. ही गोष्ट आव्हानात्मक होती. आमचे लेखक अभिजित दळवी आणि दिग्दर्शक संकेत पावसे यांच्यामुळे आव्हान सोपं झालं. 
३. शिवानी आणि पल्लवी या सहकलाकारांसह काम करण्याचा अनुभव कसा होता?
मी पल्लवीसोबत याआधी काम केलेलं आहे. एकमेकांचे नायक-नायिका म्हणून या चित्रपटात आम्ही पहिल्यांदा काम करत होतो. ती एक गुणी अभिनेत्री आहे. तिने तिची भूमिका खूप सहजतेने आणि उत्तमप्रकारे साकारलेली आहे.
शिवानीसोबत मी या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा काम करत होतो. ती जितकी छान दिसते, तितकाच सहज आणि उत्तम असा तिचा अभिनय आहे. कुठल्याही वेशभूषेत छानच दिसेल अशी ही अभिनेत्री आहे.
या दोघींनी उत्कृष्ट काम केले आहे. सिनेमा साकारण्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची ठरली. 
४. शूटिंगदरम्यानची एखादी आठवण आम्हाला सांगशील का?
सिनेमाचं संपूर्ण ३० दिवसाचं शूटिंग अहमदनगरमध्ये झालं आहे. मुंबईतील ५-६ कलाकार सोडले, तर इतर कलाकार सुद्धा त्याच भागातील होते. या सिनेमात घडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी या अचानक घडलेल्या दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे, ऑफस्क्रीन कुठलीही थट्टामस्करी करायची नाही, हे आम्ही कटाक्षाने पाळलं. जेणेकरून पडद्यावर साकारला जाणारा अभिनय सुद्धा नैसर्गिक असेल, याची काळजी घेतली गेली. आम्ही खरोखर पहिल्यांदाच भेटलो आहोत, सगळ्या गोष्टी अचानक घडत आहेत, असे प्रसंग हुबेहूब साकारत यावेत, यासाठी आम्ही ही काळजी घेतली. 
५. तू कधी कुणाला असा फोन करून त्याची मस्करी केली आहेस का?
मी कुणालाही असा प्रॅन्क कॉल करून त्रास दिलेला नाही. 'ट्रिपल सीट'च्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रॅन्क कॉल हा प्रकार अनुभवला. हा प्रॅन्क कॉल करत असताना मात्र आम्हाला खूप मजा आली. 
६. फोन करून कुणाची मस्करी करायची झाली, तर तू कुणाचा 'बकरा' करशील?
कुणालाही वाईट वाटेल, त्यांच्या भावना दुखावल्या जातील अशी गोष्ट मी करणार नाही. त्यामुळे कुणालाही प्रॅन्क कॉल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कुणी मला असा कॉल करणार असेल, तर खुशाल करावा. 
७. हा सिनेमा प्रेक्षकांनी का पाहावा असं तुम्हाला वाटतं?  
हैदराबादमध्ये खरोखर घडलेली ही घटना आहे. एखाद्या व्यक्तीशी जबरदस्तीने व नाईलाजाने लग्न करावं लागलं तर काय होऊ शकतं हे या सिनेमात पाहायला मिळेल. कुटुंबासोबत बसून, छानपैकी वेळ घालवायचा असेल, उत्तम मनोरंजन हवं असेल, तर येत्या रविवारी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता, 'झी टॉकीज'वर 'ट्रिपल सीट' हा सिनेमा पाहायला विसरू नका. 

No comments:

Post a Comment