Monday, 3 August 2020

फुलराणी रुपेरी पडद्यावर

जॉर्ज बर्नाड शॉ या प्रतिभावान लेखकाच्या अनेक कलाकृतींची आजवर वेगवेगळी यशस्वी माध्यमांतर झाली आहेत. त्यांच्या ‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म ही चांगलीच गाजली होती. आता याच ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन ‘फुलराणी ... अविस्मरणीय प्रेमकहाणी’ हा चित्रपट मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातला आहे. ‘What’s up लग्न’ या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक विश्वास जोशी ‘फुलराणी’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. त्याचे उत्सुकता वाढवणारे पोस्टरही नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.

या नव्या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. सर्वस्वी नव्या स्वरूपातील ‘फुलराणी’ प्रेक्षकांना या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात असली तरी प्रेमाचा अविस्मरणीय अविष्कार या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना बघायला मिळेल, असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी व्यक्त करतात.

बालकवी यांच्या गाजलेल्या ‘फुलराणी’ या कवितेवरूनच या चित्रपटाचे शीर्षक घेण्यात आले आहे. या कवितेला संगीतकार निलेश मोहरीर नव्या स्वरूपात संगीतबद्ध करणार आहेत. फिनक्राफ्ट मिडिया अँड एन्टरटेन्मेंट प्रा.लि यांची प्रस्तुती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक मेजवानी असेल हे नक्की. २०२० च्या अखेरीस या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल आणि २०२१ मध्ये चित्रपट रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होईल.

तिकीटबारीवर यशस्वी ठरलेल्या ‘नटसम्राट, ‘What’s up लग्न आणि लवकरच येऊ घातलेल्या ‘घे डब्बल’ या चित्रपटांनंतर विश्वास जोशी यांच्या ‘फुलराणी’ कडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

No comments:

Post a Comment