फत्तेशिकस्तच्या वेळेस शारीरिक व मानसिक तयारी केली - चिन्मय मांडलेकर
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'फत्तेशिकस्त' या मराठी चित्रपटात स्वराज्यातील पहिला 'सर्जिकल स्ट्राइक' पहायला मिळाला. शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या एका थरारक गनिमी काव्यावर आधारित असलेला हा चित्रपट १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीजवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून प्रेक्षकांकडून त्यांना दाद देखील मिळाली. त्यांच्या या भूमिकेविषयी आणि चित्रपटाविषयी चिन्मय सोबत साधलेला हा खास संवाद
१. या ऐतिहासिक चित्रपटातील भूमिकेसाठी जेव्हा तुम्हाला विचारण्यात आलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी होती?
- जेव्हा मला दिग्पालने फर्जंद सिनेमाच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विचारलं होतं तेव्हा मी खूप हुरळून गेलो होतो. खूप मोठी जबाबदारी पार पडायची होती. फर्जंदच्या वेळेस मला कळाल होता कि दिग्पाल एक सिनेमा करून थांबणार नाहीये. त्यामुळे फत्तेशिकस्त मधील भूमिका मला मिळणार याची कुणकुण मला आधी पासूनच लागलेली होती. पण दिग्पालने मला फत्तेशिकस्त सिनेमासाठी विचारलं याचा अर्थ मी फर्जंद मध्ये नक्कीच काही तरी चांगलं काम केलं होतं. या गोष्टीचा मला जास्त आनंद झाला.
२. तुमच्या चित्रपटातील भूमिकेसाठी तुम्ही कशी तयारी केली?
- फत्तेशिकस्त सिनेमामध्ये भरपूर ऍक्शन आहे, घोडेस्वारी आहे जी फर्जंदमध्ये नव्हती. त्यामुळे या सर्व गोष्टींची जोरदार तयारी करावी लागली. आम्ही संपूर्ण सिनेमा खऱ्या खुऱ्या ठिकाणी शूट केलेला आहे. राजगडावर आम्ही भरपूर शूटिंग केलेलं आहे. त्यामुळे राजगड चढून आम्ही सर्व गेलेलो होतो. या सगळ्या गोष्टी खूपच आवाहनात्मक होत्या त्यामुळे त्याची मानसिक तयारी करावी लागली. या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडे एवढे शूरवीर सरदार असताना एवढ्या जोखमीची मोहीम का केली? असा एक प्रश्न माझ्या पुढे उभा ठाकला होता. त्यामुळे भरपूर वाचन करावं लागलं. शामराव जोशी यांची यात खूप मदत झाली. शारीरिक व मानसिक, दोन्ही प्रकारची तयारी फत्तेशिकस्तच्या वेळेस करावी लागली.
३. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एखादा अविस्मरणीय किस्सा सांगा
- फत्तेशिकस्त चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान खूप महत्वाच्या गोष्टी घडल्या. त्यातली अविस्मरणीय गोष्ट म्हणजे आम्ही राजगड वर केलेलं शूटिंग. राज गडावर एक नेढे आहे, त्या नेढ्यात बसून आम्ही एक सीन केला होता. खूप उंचावर डोंगराच्या मधोमध आपोआप झालेलं एक भगदाड आहे ते. मला उंच ठिकाणांची भीती आहे. पण आम्ही तिथे जेव्हा शूटिंग केलं तेव्हा माझी संपूर्ण भीती निघून गेली. हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. अजुन एक म्हणजे मोहिमेवर निघण्याआधी माझं एक भाषण आहे. ते दिग्पालने ऐनवेळी बदललं. आधीचं भाषण त्याला फारस आवडलं नव्हतं. त्याने नंतर लिहलेलं भाषण फारच सुंदर होतं. क्वचितच एखाद्या अभिनेत्याच्या वाट्याला इतकं सुंदर भाषण सिनेमामध्ये करण्याची संधी येते. त्याने ज्या कागदावर मला ते भाषण लिहून दिल होतं त्यावर मी त्याची सही घेतली होती. अजूनही तो कागद मी जपून ठेवलेला आहे. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान माझ्या खांद्याला दुखापत झाली होती पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असल्यामुळे कायम उत्साह होता.
४. चित्रपट रिलीज झाल्यानंतर मिळालेली सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट ?
- फत्तेशिकस्तच्या रिलीज नंतर भरपूर कॉम्प्लिमेंट आल्या. अनेक मित्रांनी, दिग्गजांनी, कलाकारांनी, लहान मुलांनी कॉम्प्लिमेंट दिल्या. त्यामधील एक कॉमन कॉम्प्लिमेंट म्हणजे तू केलेले छत्रपती शिवाजी महाराज खूप खरे आणि आपल्यातले वाटतात. त्यामुळे पुढे हि भूमिका साकारताना हि गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवीन आणि पुढे देखील मी साकारलेली महाराजांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना तितकीच खरी वाटेल यासाठी प्रयत्न करेन.
५. या चित्रपटाने बॉक्सऑफिस तर गाजवलंच पण आता पहिल्यांदाच हा चित्रपट प्रेक्षक घरबसल्या झी टॉकीजवर पाहू शकतील, तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल?
- मागील वर्षी सिनेमा रिलीज झाल्यावर त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. आम्ही सर्व प्रतीक्षेत होतोच कि हा सिनेमा कधी टेलिव्हिजन वरती प्रेक्षकांच्या भेटीस येईल? तो क्षण आलेला आहे. १६ ऑगस्ट रोजी झी टॉकीज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे याचा खूपच आनंद होत आहे. प्रेक्षकांना मी हेच आवाहन करीन की प्रेक्षकांनी ही संधी दवडू नये व १६ ऑगस्ट रोजी हा सिनेमा नक्की बघावा.
No comments:
Post a Comment