झी टॉकीज करून देतंय शिवरायांच्या शिकवणीची आठवण
/
शिवरायांच्या शिकवणीतून झी टॉकीज वाढवतंय प्रेक्षकांचं मनोबल
'जय भवानी जय शिवाजी' या एका नाऱ्याने संपूर्ण महाराष्ट्र एके काळी दुमदुमला होता. आजही आपल्या राजाची प्रसिध्दी जगभरात आहे. राजाच्या एका हाकेवर स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करणाऱ्या मावळ्यांमुळे आणि अर्थात आपल्या राजा मुळेच आज हा महाराष्ट्र मानाने उभा आहे. शत्रू कितीही बलवान असला तरी धैर्य आणि संयमाने त्याच्यावर विजय मिळवता येतो, महाराजांच्या या शिकवणीचा विसर या महाराष्ट्राला कधीच पड़ला नाही आणि त्यामुळेच आज कोरोना सारख्या महामारीलासुद्धा हा महाराष्ट्र समंजसपणे तोंड देत धैर्याने उभा आहे. या धैर्याला मानाचा मुजरा करत शिवरायांच्या शिकवणीचे महत्व सांगण्यासाठी झी टॉकीज या वाहिनीने एक प्रेरणादायी व्हिडिओ आपल्या प्रेक्षकांसाठी आणला आहे. सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
सध्या संपूर्ण जग हे कोरोना व्हायरस या महामारीशी झुंजतंय. यात डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारीरुपी योद्धे हे पूर्णपणे लढाईमध्ये उतरून शत्रूचा सामना करत आहेत. पण त्यांच्या लढ्याला आपल्या धीराची आणि समजूतदारपणाची साथ मिळाली तरच ही लढाई आपण जिंकणार आहोत. येणाऱ्या काळात सामाजिक, भावनिक आणि आर्थिक पाळतीवर आपण सगळे एक वेगळा लढा लढणार आहोत आणि या संकटावर मत करून विजय मिळवणार आहोत. या लढ्यात बेलगाम शौर्यापेक्षा आपल्या संयमी धैर्याची कसोटी लागणार आहे. आपल्याला प्रत्येक क्षणी सावधगिरीने वागून एकमेकांना सांभाळून पुढे जायचं आहे. ही कठीण वेळ निभावून नेण्यासाठी शिवरायांच्या शिकविणीची आठवण करून देणारा हा प्रेरणादायी व्हिडिओ झी टॉकीज वाहिनी तसेच झी टॉकीजच्या सोशल मिडियावर प्रसारित होत आहे. या संदेशामुळे सर्व प्रेक्षकांना नक्कीच उभारी मिळेल आणि संकटाला तोंड देण्याची जिद्द अजून वाढेल अशी आशा झी टॉकीजच्या टीमला वाटत आहे.
No comments:
Post a Comment