निखिल दामले (ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण - झी युवा)
गणपती हा सगळ्यांचा लाडका सण असतो, माझ्याकडे पण या सणाची एक गोड आठवण आहे, मी लहान असताना माझ्या आई बाबांसोबत पुण्यात गणपती पहायला बाहेर पडायचो. पण मी त्यावेळी लहान होतो त्यामुळे मला गर्दीत गणपती दिसायचे नाहीत मग बाबा मला खांद्यावर बसवून गणपती दाखवायचे त्यात एक वेगळी मजा असायची. आता मात्र ही मजा मला घेता येत नाही कारण अर्थातच मी आता मोठा झालोय. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेच्या चित्रीकरणासाठी मी मुंबईमध्ये आहे आणि त्यात यावर्षीतर कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गर्दीमध्ये जाणे टाळायचे आहे पण यातही या छोट्या छोट्या गोड आठवणी आपल्याला आनंद देऊन जातात हे महत्वाचं.
सुनिल गोडबोले (ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण - झी युवा)
गणपतीच्या आगमनाची तयारी आपण दरवर्षी जोरदार करत असतो मात्र यावर्षी चित्र थोडे वेगळे असणारे कारण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या तयारीमध्ये आपल्याला स्वतःची काळजी घ्यावी लागणारे मग गर्दीत जाणे टाळायचे, मास्क लावायचा, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं. आपण जर आपली काळजी घेतली तरच दुसऱ्यांना पण सुरक्षित ठेवू, कोरोनाचं संकट तर या वर्षा-अखेरपर्यंत संपुनही जाईल पण सणवार तर दरवर्षी येतच राहणार त्यामुळे यावर्षी जरा काळजी घ्या पुढच्या वर्षी दणक्यात गणेशोत्सव साजरा करुच.
गौरी कुलकर्णी (ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण - झी युवा)
दरवर्षी माझ्या घरी दहा दिवसाचा गणपती बसतो त्यामुळे या सणाच्या खुप साऱ्या आठवणी माझ्याकडे आहेत. मग बाप्पासाठी सुंदर आरास बनवणं असो मोदक बनवणं असो त्याची सजावट करणं असो. एक ना अनेक. आम्ही दरवर्षी अगदी पारंपारिक पद्धतीने आणि श्रद्धेने उत्साहामध्ये बाप्पाला आणायला जातो. हे दिवस आमच्याकडे एखाद्या सोहळ्यासारखे साजरे होतात, आमच्या घरात महालक्ष्मी पण बसतात त्यामुळे त्यांचे कार्यक्रम, जेवणं घरात पाहुण्याची रेलचेल सुरु असते. खुप आवडतं मला या सगळ्या गोष्टी करायला फक्त यावर्षी कोरोनामुळे हा सण साध्यापद्धतीने साजरा करावा लागणारे खूप नियम आपल्याला पाळावे लागतील पण यासगळ्या नियमांना पाळत आपण हा सण साजरा करुया आणि बाप्पाचं आगमन मनोभावे करुया.
No comments:
Post a Comment