Wednesday 6 January 2021

Zee Yuva - Dr. Don

 कबीर बनला आजीबाई

देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, 'झी युवा' वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. डॉक्टर डॉनने टेलिव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घालत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा यासगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.
या मालिकेतील प्रेक्षकांची अजून एक आवडती जोडी म्हणजे राधा आणि कबिरची. कबीर हा तर तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. पण कबीरच एक नवीन रूप मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका सीनच्या चित्रीकरणासाठी कबीरने चक्क आजीचा वेष धारण केला आहे. त्याच्या या गेटअप मधील फोटो त्याने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे. राधा आणि कबीरचं भांडण झालं असलं कारणामुळे राधा कबीरला घरी घेत नाही आहे. कबीरला राधाचा सहवास मिळावा म्हणून तो आजीचा वेष धारण करून तिच्या घरी जाऊन नातेसंबंध कसे जपावेत याबद्दल समजावतो. आजीचं बोलणं ऐकून राधाला तिची चूक समजते आता ती कबीरसोबत पॅचअप करणार का हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
या वेगळ्या भूमिकेबद्दल बोलताना कबीर म्हणजेच अभिनेता अनुराग वरळीकर म्हणाला, "डॉक्टर डॉन या मालिकेमुळे कबीर हा घराघरात पोहोचला आणि प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग बनला. आता मी आजीच्या गेटअप मध्ये प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या वेषभूषेसाठी टीमने खूप मेहनत घेतली आहे. पण प्रेक्षकांना हि आजी बघताना नक्की मजा येईल."

No comments:

Post a Comment