चित्रपट ही एक मनोरंजनाची अद्भुत कला तर ती पाहणं हा विलक्षण अनुभव. आजपर्यंत विविध जातकुळीच्या चित्रपटातून प्रबोधनापासून मनोरंजनापर्यंत आणि इतिहासापासून वर्तमानापर्यंत अनेकविध आशय विषयाने प्रतिभावंतांच्या प्रतिभा उजळल्या आहेत. आपल्या चित्रपटाला रसिकांच्या हृदयात स्थान मिळावे यासाठी ते नानाविविध प्रयत्न करताना दिसतात. असंच काहीतरी वेगळं अफलातून मनोरंजन करण्यासाठी अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर सज्ज झाले आहेत. त्यांच्या ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या वऱ्हाडी वाजंत्री या धम्माल विनोदी चित्रपटासोबत.
अनेक चित्रपटांची टायटल्स रसिक प्रेक्षकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेली आहेत. विषयाला अनुसरून आपल्या चित्रपटाची टायटल्स करण्यासाठी निर्माते दिग्दर्शक जंगजंग पछाडत असतात. विशेष टॅलेंटचा वापरून करून आकर्षक टायटल्स निर्मितीवर भर दिला जातो. अश्याच काहीश्या भन्नाट कल्पनांमध्ये आपल्या चित्रपटाचं नाव रसिकांच्या मनःपटलावर कोरण्यासाठी अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर सध्या गुंतले आहेत. त्यांच्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटाचे टायटल्स तयार करण्याचे काम जोमात सुरु आहे. प्रख्यात पब्लिसिटी डिझायनर मिलिंद मटकर भन्नाट कल्पना रेखाटण्यात गुंग झाले आहेत. दिग्दर्शक विजय पाटकर आणि निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्या संगनमताने या चित्रपटाची धम्माल उडवणारी श्रेयनामावली मिश्किल विनोदी हावभावांसह अनोख्या स्टाईलने पडद्यावर आणण्यासाठी त्यांची घालमेल सुरु आहे.
नावाप्रमाणेच या चित्रपटात एकापेक्षा अवखळ विनोदवीरांना घेऊन दंगा करण्यासाठी विनोदाचा बादशहा मकरंद अनासपुरे ‘वऱ्हाडी वाजंत्र्यां’सह येत असून. त्याच्यासह २१ नमुनेदार विनोदवीरांची वेगळी छटा मिश्किल विनोदी ढंगात टायटल्समध्ये उमटविण्याचे अवघड काम ही त्रयी सध्या समरसून करीत आहे. मकरंद अनासपुरे यांचे भन्नाट कार्टून लहान थोरांना गुदगुल्या करणारे असून त्यांच्या या छबीचे 'मिम्स' चित्रपट आल्यावर होतील हे नक्की. त्यासोबतच पॅडी आणि हेमांगीचीही कार्टून्स लयभारी झाली असून तीही सगळ्यांना प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत. याहून जबरदस्त म्हणजे मोहन जोशी, रीमा यांचे बुलेटराजा - राणी दर्शन आहे. त्यासोबतच प्रिया बेर्डे - विजय कदम यांचा ठुमक्याचा ठेका कमाल झाला आहे. तर जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, प्रशांत तपस्वी, राजेश चिटणीस, जयवंत भालेकर, विनीत बोंडे, शिवाजी रेडेकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे आदी कलाकारांच्याही इरसाल नमुनेबाज व्यक्तिरेखा या चित्रपटाच्या कथेसोबतच 'टायटल्समधेही धम्माल' करणार असल्याने हे ‘वऱ्हाडी वाजंत्री’ प्रेक्षागृहात हशाच हशा पिकणार हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तर वाट पाहुयात ११ नोव्हेंबरची.
No comments:
Post a Comment