*ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी 'एक होतं पाणी'चे केले तोंडभरून कौतुक*
निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच *व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज* , प्रस्तुत *डॉ.प्रवीण भुजबळ व विजय तिवारी* निर्मित आणि *रोहन सातघरे* दिग्दर्शित *'एक होतं पाणी'* सारखा एखादा चित्रपट आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतो. *अन्न, वस्त्र, निवारा* या मानवाच्या मूलभूत गरजांची जागा आत्ता अनावश्यक भौतिक गोष्टींनी घेतल्यामुळे आपल्याला खरा विकास कशात आहे हेच उमगत नाही. असाच एक मूळ मुद्दा या चित्रपटाच्यारूपाने साऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. " *एक होता राजा,एक होती राणी.उद्या म्हणू नका, 'एक होतं पाणी'* प्रत्येकालाच विचार करायला भाग पडणारी ही टॅगलाईन साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतेय. पाण्याची समस्या इतकी बिकट होईपर्यंत प्रशासन दुर्लक्ष कसं करू शकतं ह्यावर प्रकाश टाकणारा *'एक होतं पाणी'* या चित्रपटाच्या टीमने सध्या राळेगणसिध्दीला जाऊन *_ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे* यांची सदिच्छा भेट घेतली असून ' *पाणी* ' या विषयावर गहन चर्चा देखील केली.
पाण्यासाठी महायुद्ध होण्याची वेळ आली असून पाणी मुबलक असेल तर आणि तरच गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा म्हणजे राज्य आणि देशाचा विकास होऊ शकतो असं परखड मत *ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे* यांनी यावेळी मांडलं. शिवाय त्यांनी या चर्चेत पुढे असं ही म्हटलं की आजची परिस्थिती भयानक झाली आहे. एवढे उच्च शिक्षित मंत्री व अधिकारी असतांना पाण्याच्या नियोजनाचा अभाव दिसून येतोय. वैयक्तिक सुखाच्या मागे माणूस लागल्याने पर्यायाने गावाचा विकास खुंटतोय. एक होता राजा,एक होती राणी तसे *एक होतं पाणी* असे म्हणण्याची खरंच वेळ येऊ नये. आज आमच्या गावात राळेगणसिद्धीमध्ये पाण्याची कमतरता नाहीये कारण गेल्या काही वर्षांपासून आम्ही त्यावर सगळे मिळून एकजुटीने काम करतोय. गावोगावी पाण्याअभावी टँकर सुरू झाले आहेत पण आम्ही बाहेरच्या गावांना टँकर देतो. पाणी वाचवण्यासाठी कठोर कायदा केला पाहिजे पण सरकारला मात्र केवळ मते हवी आहेत. त्यामुळे ते कायदा करायला घाबरतात. प्रत्येक गावाने एकत्र येत पाण्याचे नियोजन करणं ही काळाची गरज झाली आहे.इतक्या महत्वाच्या विषयावर सिनेमा बनवल्याबद्दल तुमचं कौतुक आहे.त्यात हा सिनेमा नगर जिल्ह्यात चित्रित झालाय व सिनेमात त्यामुळे दाखविण्यात आलेली टँकरची परिस्थिती या ठिकाणी वास्तव अशी आहे तर मराठवाडा व विदर्भात काय असेल ?याचा अंदाज येतो. त्यातून लोकांनी काहीतरी बोध घ्यायला हवा. अनेक चित्रपट मनोरंजन करतात तर काही सिनेमे फक्त मनोरंजन नाही तर काळजात घर करून राहतात. त्यापैकी पाण्याच्या गहन विषयावर हा सिनेमा आहे.
पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट दुष्काळग्रस्त गावांत टँकरने पाणी उपलब्ध करून देणारी प्रशासकीय योजना कशी केवळ कागदावरच राहिलीये त्याचं उत्तम उदाहरण देतो. *'एक होतं पाणी'* ही गोष्ट अशाच एका गावाची आहे ज्यात गावासाठी पाण्याची सोय प्रशासनाने केली आहे. टँकरची नोंदही कागदोपत्री सापडते पण गावात मात्र पाण्याचा एक थेंबही नाही. पाण्याअभावी आतापर्यंत कित्येक गावकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे पाणी नेमकं जातं तरी कुठे... प्रशासनाचा हा अंधाधुंद कारभार कोणाच्याच लक्षात येऊ नये... पाण्यासाठी वणवण करणाऱ्या गावकऱ्यांनी जायचं कुठे-करायचं तरी काय या आणि अशा अनेक प्रश्नांना उत्तर देणार तरी कोण... याचा उहापोह *'एक होतं पाणी'* करतं. अशा वास्तव व गंभीर विषयावर लेखन केल्याने या *चित्रपटाचे लेखक आशिष निनगुरकर* यांचे ज्येष्ठ *समाजसेवक अण्णा हजारे* यांनी मनापासून कौतुक केले व अशा ज्वलंत विषयावर प्रकाश टाकत प्रशासनाचे डोळे उघडू पाहणारा हा चित्रपट समाजात जनजागृती घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामाजिक बांधिलकी जपत आपलं भविष्य आपल्याच हाती आहे हा संदेश *'एक होतं पाणी'* अधोरेखित करतो. *'पाणी अडवा पाणी जिरवा'* ची सध्या नितांत गरज असून *'एक होतं पाणी'* म्हणण्याची वेळ येऊ देण्यापूर्वीच त्याविषयी समाजात जागरूकता घडवून आण्यासाठी हा चित्रपट नक्कीच मदतशील ठरेल. या चित्रपटात हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, बालकलाकार चैत्रा भुजबळ,गणेश मयेकर,दिपज्योती नाईक,रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे,आशिष निनगुरकर, डॉ.राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे, वर्षा पाटणकर,अनुराधा भावसार,कांचन दोडे व संदीप पाटील आदि कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळतील. या चित्रपटातील गाण्यांना संगीत विकास जोशी यांनी दिले असून *ऋषिकेश रानडे,आनंदी जोशी,रोहीत राऊत,मृण्मयी दडके-पाटील व विकास जोशी* यांनी या गाण्यांना स्वरसाज दिला आहे.या सिनेमाचे छायाचित्रण *योगेश अंधारे* यांनी केले असून निर्मिती व्यवस्थापक म्हणून *प्रतिश सोनवणे,सिद्धेश दळवी,सुनील जाधव व स्वप्नील निंबाळकर* यांनी काम केले आहे.हा चित्रपट *१० मे* पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
No comments:
Post a Comment