Tuesday 12 November 2019

बहुमाध्यम प्रदर्शनीचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे हस्ते उद्‌घाटन संपन्न


नांदेड, 12 नोव्हेंबर 2019
श्री गुरुनानक देवजी यांच्या 550 व्या जन्म जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बहुमाध्यम प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायु परिवर्तन आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नांदेड येथील मल्टीपर्पज हायस्कूल प्रांगणात आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनीचे उद्घाटन फित सोडून, श्री गुरुनानक देवजी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जावडेकर यांनी केले. 
यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, महापौर श्रीमती दीक्षा धबाले, माहिती अणि प्रसारण विभागाचे पश्चिम विभागाचे महासंचालक आर.एन. मिश्रा, अतिरिक्त महासंचालक डी.जे.नारायण, प्रादेशिक लोकसंपर्क ब्‍यूरो पुणे संचालक संतोष अजमेरा, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर तख्त सचखंड श्री गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदर सिंघ वाघवा,जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती पुनम पवार आदींची उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले, श्री गुरु नानक देवजी यांनी जगाला ज्ञान देण्याचे काम केले आहे. एक ओमकार, एक सत्य हा मंत्र त्यांचा असून आपण प्रामणिकपणे कष्ट करण्याबाबतही संदेश त्यांनी दिलेला आहे. श्री गुरु नानकजी यांचे कार्य आणि तत्वज्ञानाचे समाजासाठी मोठे योगदान आहे. सर्वांनी मिळून भेदभाव विसरुन श्री गुरु नानकजींने कार्य केले. त्यांच्या जयंती निमित्त त्यांची आठवण करत सर्वांनी एकजूट होऊन सत्याच्या मार्गाने पुढे जाऊ या, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी केले. मंत्री महोदयांच्‍या भाषणापुर्वी माहिती प्रसारण मंत्रालयाचे महासंचालक यांनी प्रास्‍ताविकातून प्रदर्शनीची माहिती दिली.
उद्घाटनानंतर जावडेकर यांनी श्री गुरुनानकजी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन एलईडी स्क्रीनद्वारे कर्तारपुर साहेब आणि नानकानासाहेब या गुरूव्‍दारांचे दर्शन या प्रदर्शनातून घेतले. शबद आणि चार उदासीची माहिती एलईडी स्क्रीनद्वारे माहिती घेतली. त्याचबरोबर श्री गुरुनानकजी यांच्या जीवनावर आधारीत लाईट व साउंड शो तसेच मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शीख मुलमंत्रांने सर्वांची मने जिंकली. 
सोमवार 18 नोव्‍हेंबर 2019 पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत चालणाऱ्या या बहुमाध्‍यम प्रदर्शनात श्री गुरूनानक देवजी यांच्‍या जीवनावर आधारित माहिती मिळणार आहे. वायरलेस हेडफोनच्‍या साहयाने एलईडी स्‍क्रीनवर श्री गुरूनानक देवजी यांचे जीवनकार्याबाबतची माहिती पहावयास मिळणार आहे. नांदेड शहरात प्रथमच आयोजित केलेल्या या प्रदर्शनीमध्‍ये व्‍ही. आर. तंत्रज्ञानाच्‍या मदतीने असलेल्‍या कर्तारपुर साहेब आणि नानकानासाहेब या गुरूव्‍दारांचे दर्शन या प्रदर्शनातून घडत आहे. प्रदर्शनी सर्वांसाठी सात दिवस मोफत खुली ठेवण्यात आले आहे, याचा लाभ नागरिक व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी आयोजकामार्फत करण्यात आले.

No comments:

Post a Comment