Thursday 19 March 2020

डान्सर अपेक्षा लोंढेची स्वतःशीच स्पर्धा!!!

'झी युवा' वाहिनीवरील 'युवा डान्सिंग क्वीन' ही स्पर्धा आता फारच चुरशीची झालेली आहे. या अपेक्षा लोंढे अटीतटीच्या स्पर्धेतदेखील, स्वतःशीच स्पर्धा करत आहे. इतर स्पर्धकांच्या आव्हानापेक्षा, स्वतःच्याच सादरीकरणात सुधारणा कशी करता येईल, याचा विचार ती अधिक प्रमाणात करते आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा
१. तुझ्या आवडीचा आणि सर्वोत्तम नृत्यप्रकार कुठला? 
गेल्या आठ वर्षांपासून मी नृत्य करते आहे. खरंतर मला सगळ्याच प्रकारची नृत्ये आवडतात. पण, कंटेम्पररी डान्स फॉर्म मला सर्वाधिक आवडतो. या प्रकारातील नृत्यकला जोपासण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असते.
२. तुझ्यासाठी मयूर आणि सोनाली यांच्यातील अधिक लाडकं कोण आहे?
दोन्ही परिक्षकांविषयी मला आदर आहे. दोघेही माझ्या आवडीचे आहेत. पण, सोनाली ताई मला थोडी अधिक आवडते. आमचं नृत्य ती मनापासून एन्जॉय करते. आमच्या डान्समधील बारकावे आम्हाला नीट समजावून सांगते. आमच्या नृत्यकलेतील खासियत तिच्या लक्षात येते, आणि ती त्याविषयी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करते. सोनाली ताईचा स्वभाव सुद्धा खूपच छान आहे. ती आम्हाला नेहमीच समजून घेते.
३. स्पर्धेतील कोणता स्पर्धक तुझ्यासमोर मोठे आव्हान उभे करू शकेल, असं तुला वाटतं?प्रत्येकच स्पर्धक आपली सर्वोत्तम कला सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे सगळ्याच स्पर्धकांना एकमेकांचे तगडे आव्हान असणार आहे. अर्थात, माझी सगळ्यात पहिली स्पर्धा, ही स्वतःशी असते. प्रत्येकवेळी काहीतरी नवं आणि वेगळं करण्याचा माझा प्रयत्न असतो. माझे नृत्य, माझ्याच आधीच्या परफॉर्मन्सपेक्षा उत्तम असायला हवे यासाठी मी मेहनत घेते. त्यामुळे मी स्वतःच माझी सर्वात मोठी स्पर्धक आहे, असं मी म्हणेन. 
४. तुझ्या उत्तम परफॉर्मन्सबद्दल जेव्हा तुझं खूप कौतुक होतं, त्यावेळी तुझ्या मनातील भावना नेमक्या कशा असतात?
परीक्षक आणि प्रेक्षकांना माझं नृत्य आवडलं, त्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, की खूप छान वाटतं. स्पर्धेतील इतर स्पर्धकांकडून जेव्हा कौतुकाची थाप मिळते, त्यावेळी मिळणारा आनंद आणि समाधान खूप मोठं असतं. माझ्या गुरूंनी माझ्यासाठी घेतलेली मेहनत आणि माझ्या कष्टांचे चीज झाले असल्याची भावना मनात असते. 
५. 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावरील एखादी आठवण, शूटिंगदरम्यानचा अनुभव आम्हाला सांग.'
युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावरील आम्ही सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे राहतो. एकत्र जेवायला बसणे, एकमेकांसोबत थट्टामस्करी करणे, अशा गोष्टी नेहमीच सुरू असतात. ऑनस्क्रीन आम्ही एकमेकींच्या स्पर्धक असलो, तरीही आमच्यातील ऑफस्क्रीन मैत्री उत्तम आहे. एकमेकींची काळजी घेणे, मिळून-मिसळून राहणे, आणि एकमेकांना समजून घेणे, या गोष्टी अगदी सहजपणे घडत असतात. 
६. तुझ्या अनेक परफॉर्मन्समध्ये तू वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट केले आहेस. यासाठी कशाप्रकारे तयारी करावी लागते?
मानसिक तयारी करणे, हे आव्हान सर्वप्रथम माझ्यासमोर असते. ओंकार सरांचा मान राखणे, त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणे, एवढ्याच गोष्टी त्यावेळी माझ्या मनात असतात. मी सतत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करते. एकदा का मनाची तयारी झाली, की इतर गोष्टी सोप्या जातात.

No comments:

Post a Comment