मुंबई, 12 ऑक्टोबर, 2020: इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) २०२०/२०२१ च्या नव्या मोसमासाठी मुंबई सिटी एफसी संघाने आज मुख्य प्रशिक्षक म्हणून सर्गिओ लोबेरा यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली.
स्पेनच्या लोबेरा यांना जगभरातील विविध लीगमधील २५ वर्षाच्या कारकिर्दीत प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी स्पेन, मोरोक्को आणि भारतातील क्लब संघांना मार्गदर्शन केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी २०१२ मध्ये बार्सिलोना एफसी संघाचे सहाय्यक व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे.
मुंबई सिटीशी करारबद्ध होण्यापूर्वी लोबेरा एफसी गोवा संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली २०१९च्या मोसमात एफसी गोवा संघाने सुपर कप स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.
लोबेरा यांच्या नियुक्तीविषयी बोलताना मुंबई सिटी एफसी संघाचे सह मालक बिमल पारेख म्हणाले,"सर्गिओ यांचे मुंबईत स्वागत करताना आम्ही रोमांचित झालो आहोत. विजयाची सवय असलेले एक जबरदस्त प्रशिक्षक अशी त्यांची ओळख आहे. त्यांची क्षमता आणि काम करण्याची हातोटी बघता ते मुंबई संघाला देखील नव्या उंचीवर नेऊन ठेवतील असा विश्वास वाटतो. त्यांनी सुपर कप जिंकून आधीच आपली योग्यता सिद्ध केली आहे. लोबेरा यांची हीच विजयी मानसिकता नक्कीच आम्हाला सर्वोत्तम ठरण्यासाठी फायद्याची ठरेल."
प्रशिक्षक लोबेरा हे देखील आपल्या नव्या नियुक्तीने प्रेरित झाले होते. आपल्या या नव्या संघाच्या जबाबदारीबद्दल बोलताना लोबेरा म्हणाले,"मुंबई सिटी एफसी संघाबरोबर काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. आयएसएलमध्ये मी आता रमलो आहे. पण, या लीगमध्ये अजूनही खूप काही करण्यासारखे आणि मिळवायचे आहे. माझा खेळाडू, भागीदार आणि व्यवस्थापनावर पूर्ण विश्वास आहे. ते नक्कीच मला पूर्ण सहकार्य करतील आणि नवा मोसम संस्मरणीय करतील. या संघात चांगली गुणवत्ता आहे आणि लवकरात लवकर खेळाडूंबरोबर काम करण्यासाठी मी उत्सुक आहे."
मुंबई सिटी एफसी संघाबरोबर काम करायला मिळणे म्हणजे आपल्या कारकिर्दीमधील एक नवा अध्याय असल्याचे सांगून लोबेरा म्हणाले,"मला या नव्या संघाच्या जबाबदारीचे आकर्षण आहे आणि येथे असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि त्यांची फुटबॉलशी असलेली जवळिक यामुळे मी प्रभावित झालो आहे.
सर्गियो यांच्याबरोबर त्यांची सहाय्यक टीम देखिल मुंबई सिटी एफसी संघाशी जोडली गेली आहे. यामध्ये सहाय्यक प्रशक्षिक जीझस टाटो, फिटनेस आणि कंडिशनिंग प्रशक्षिक्ष मॅन्युएल सायाबेरा यांचा समावेश आहे. हे दोघे देखील एफसी गोवा संघाशीच करारबद्ध होते. गोलरक्षक प्रशिक्षक म्हणून ज्युआन मारिया क्रुज अरियाझ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी सर्गिओ यांच्याबरोबर मोरोक्कोच्या मोघरेब टेटौआन क्लबमध्ये काम केले आहे.
मुंबई सिटी एफसी क्लबचे सल्लागार म्हणून काम करणाऱ्या सिटी फुटबॉल ग्रुपने सर्गिओ यांची मुंबई सिटी एफसी संघाच्या व्यवस्थापन मंडळाशी ओळख करून दिली. सिटी फुटबॉल ग्रुपने मुंबई सिटी एफसी क्लबमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असून त्यांनी तसा प्रस्ताव देखिल ठेवला आहे. त्यांना फक्त प्रस्ताव मान्य होण्याची प्रतिक्षा आहे.
No comments:
Post a Comment