Wednesday 11 March 2020

डॉ. गिरीश ओक साकारणार, विक्षिप्त दांडेकर!!!


मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अप्रतिम अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते डॉ. गिरीश ओक, आता 'झी टॉकीज'च्या 'गोल गोल गरा गरा' या सिनेमात दिसणार आहेत. दादा दांडेकरांची भूमिका साकारणाऱ्या या प्रतिभावान अभिनेत्याशी या निमित्ताने गप्पा मारण्यात आल्या.
१. 'गोल गोल गरा गरा' या चित्रपटातील तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात सांगा
दादा दांडेकर, हा प्रथमदर्शनी विक्षिप्त वाटणारा माणूस आहे. पण, तो तसा का झालाय, हे हळूहळू समजत जातं. अर्थात, त्याच्या या विक्षिप्तपणामुळे अनेक गमतीजमती घडतात. अनेकजण त्याचा फायदा घेतात, त्याला त्रासही देतात. दादा दांडेकरांची ही, विनोदी भूमिका मी साकारत आहे.
२. चित्रपटाच्या प्रोमोजमधून दादा दांडेकर यांना स्त्रियांबद्दल किती चीड आहे हे दिसून येत, ही भूमिका  तुम्हाला सोपवली त्यावेळी तुम्ही प्रतिक्रिया काय होती?
मालिकेचे निर्माते सुनील रानडे, यांनी मला या भूमिकेविषयी विचारणा केली. अतुल काळे हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत, हे मी ऐकून होतो. सुनीलने माझ्यासाठी निवडलेली भूमिका उत्तमच असणार, याची मला खात्री होती. माझ्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका करण्याची संधी मिळणार असल्याने मी खुश होतो.
३. तुम्ही खऱ्या आयुष्यात या भूमिकेच्या किती विरुद्ध आहात?
खऱ्या आयुष्यात, मी या पात्रापेक्षा खूपच वेगळा आहे. मला स्त्रियांविषयी नितांत आदर आहे. मी आजवर कधीही, स्त्रियांचा अनादर केलेला नाही. त्यामुळे या चित्रपटात मी साकारत असलेली भूमिका, माझ्या विरुद्ध प्रकारची होती, असं म्हणायला हरकत नाही.
४. तुमच्यासोबत अनेक कलाकारांची फौज या चित्रपटात आहे, त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? चित्रीकरणाच्या दरम्यान घडलेला एखादा किस्सा तुम्ही शेअर करू शकाल?
मी या मनोरंजन विश्वात आलो, त्यावेळी मी उदय टिकेकरचा चाहता होतो. त्यानंतर आम्ही एकत्र काम सुद्धा केलं. एकत्र काम करण्याचा योग फारवेळा आलेला नसला, तरी आम्ही एकत्र काम करणं खूप एन्जॉय केलं आहे. उदय माझा चांगला मित्र आणि आवडता सहकलाकार आहे. पल्लवी पाटीलसोबत मी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच काम केलं. या सगळ्या तरुण पिढीसोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता.
५. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात तुमच्या यशस्वी कारकिर्दी मागे तुमची प्रेरणा, तुमची सपोर्ट सिस्टम कोण आहे?  
आई, प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. आपल्या मुलाला योग्य ती शिकवण देणे व चूक झाल्यास समजून घेण्याचे काम ती करत असते. त्यानंतर पत्नी आयुष्यात येते. तिने सुद्धा योग्यप्रकारे साथ देणं, समजून घेणं गरजेचं असतं. मला माझ्या पत्नीची योग्य साथ मिळाली म्हणून आज मी इथे आहे.
६. झी टॉकीज ओरिजिनल कॉन्टेन्ट सादर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल.
झी टॉकीजचा हा नवा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. अनेक नवे कलाकार, तंत्रज्ञ इत्यादी मंडळींसाठी  खूप मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. 'झी टॉकीज'ने कलाकारांसाठी हा एक नवा मंच निर्माण केलेला आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अनेक दर्जेदार चित्रपट 'टॉकीज ओरिजिनल'मधून पाहायला मिळतील, याची खात्री वाटते.

No comments:

Post a Comment