Monday, 9 March 2020

'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण'च्या सेटवर आदेश बांदेकरांचा पाहुणचार


पाश्चिमात्य संस्कृतीच्या विरोधात असणाऱ्या आप्पांना, नचिकेतच्या रूपात अवलिया भेटला. एनआरआय असलेल्या नचिकेतने, आप्पांच्या नातीला, म्हणजेच सईला पटवलं आणि 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेची रंगत अधिकच वाढली. नचिकेत आणि सईची अनोखी प्रेमकहाणी आणि अप्पा व नचिकेतची जुगलबंदी, 'झी युवा' वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता पाहायला मिळते. या हटके मालिकेवर, प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. नचिकेत आणि सईची ही प्रेमकहाणी, तरुणांना आपलीशी वाटते. पाश्चात्य संस्कृती आणि भारतीय परंपरांचा समतोल राखणाऱ्या तरुणांना 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेविषयी खूपच आपलेपणा वाटतो. आपलेच आयुष्य पडद्यावर पाहायला मिळत असल्याची भावना तरुणांच्या मनात आहे. प्रेक्षकांचा मिळत असलेला उदंड प्रतिसाद आणि प्रेम याच्या आशीर्वादाने, आज या मालिकेचे २०० भाग पूर्ण झाले आहेत. मालिकेतील कलाकारांना चाहत्यांचे भरपूर प्रेम लाभले आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया नेहमीच टीमचा उत्साह वाढवणाऱ्या ठरल्या आहेत.
२०० भाग पूर्ण झाले असल्याचे जंगी सेलिब्रेशन मालिकेच्या सेटवर करण्यात आले. अर्थात, या हटके मालिकेच्या यशाचे सेलिब्रेशन सुद्धा तशाच हटके पद्धतीने झालेले पाहायला मिळाले. केक कापून आनंद साजरा करण्याची संस्कृती आता भारतीय संस्कृतीचा सुद्धा अविभाज्य भाग झालेली आहे. परंतु, महाराष्ट्रातील संस्कृती हा मुख्य विषय असलेल्या या मालिकेचा सेट, या पद्धतीपासून दूर होता. संपूर्ण टीमने पारंपरिक कपडे परिधान केले होते. मालिकेचे निर्माते, आदेश आणि सुचित्रा बांदेकर सुद्धा सेटवर हजर होते. या दोघांचेही सेटवर स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रात परंपरागत चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे, जेवणाची पंगत 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण'च्या सेटवर पाहायला मिळाली. २०० भाग पूर्ण केल्याचा आनंद या टीमने साजरा केला, तो 'फुल्ली देसी' स्टाईलने!
मालिकेच्या या यशाबद्दल बोलताना, निर्माते आदेश बांदेकर म्हणाले;
"मालिकेच्या या यशामध्ये संपूर्ण टीमचा वाटा आहे. टीममधील प्रत्येकाचे मी मनापासून अभिनंदन करतो. 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण'चा एकंदर प्रवास उत्तमरीत्या सुरु आहे. ही मालिका प्रेक्षकांना पसंत पडते आहे, याचा मला आनंद आहे. सहसा मालिकेच्या सेटवर केक कापून आनंद साजरा करण्यात येतो. परंतु, यावेळी वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करायचे टीमने ठरवले होते. माझ्यासाठी हे एक खूप मोठे सरप्राईज ठरले. महाराष्ट्रीय संस्कृतीचे महत्त्व सांगण्याचा, व संस्कृती जपण्याचा प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून करायचा आहे. मालिकेच्या यशाचा आनंद साजरा करत असताना, त्या सेलिब्रेशनवर सुद्धा त्याचा प्रभाव पडणे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी केक न कापता पंचपक्वान्न असलेलं ताट माझ्या आणि सुचित्रासाठी सजवलेलं होतं. त्यातील पुरणपोळीवर आम्ही ताव मारला. अशाप्रकारे आनंद साजरा करण्याची संधी आम्हाला वारंवार मिळत राहील, याची मला खात्री वाटते."

No comments:

Post a Comment