आपत्कालीन ९० दिवसांत लहान मुलांवर आपत्कालीन यशस्वी हृदयशस्त्रक्रिया केल्या
मुंबई, ७ जुलै २०२०:- कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने (केडीएएच) कोव्हिड-१९ महामारीदरम्यानही आपत्कालीन सेवा देणे सुरूच ठेवले आहे. लॉकडाउन असले, तरी आपत्कालीन वैद्यकीय सेवांची गरज निर्माण होतच असल्यामुळे हॉस्पिटलने महाराष्ट्रभरात जन्मजात हृदयविकार असलेल्या लहान मुलांवर यशस्वीपणे 30 हृदयशस्त्रक्रिया करत त्यांना या गंभीर आजारात वेळीच उपचार मिळवून दिले आहेत. या रुग्णांमध्ये फक्त सात दिवसांच्या तान्ह्या बाळापासून १४ वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश असून ही मुले महाराष्ट्रातल्या ११ जिल्ह्यांतली आहेत. त्यात हिंगोली, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, सांगली, जळगाव, उस्मानाबाद, पुणे, ठाणे, मुंबई तसेच भारतातील इतर काही राज्यांचा समावेश आहे.
सात दिवसांची सर्वात लहान रुग्ण मुंबईतल्या धारावीसारख्या कोव्हिड-१९ प्रतिबंधक क्षेत्रातील होती व तिला आर्क दुरुस्तीसाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. ही शस्त्रक्रिया पूर्णपणे कोव्हिड-१९ च्या नियमावलीचे पालन करत सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेत करण्यात आली. एप्रिल महिन्यात झालेल्या या शस्त्रक्रियेनंतर दोन आठवड्यांनी बाळाला घरी सोडण्यात आले व आता ती पूर्णपणे बरी आहे.
आणखी एका केसमध्ये नाशिकच्या तीन महिन्यांच्या बाळाचा फेरी अम्ब्युलन्सच्या मदतीने केडीएएचमध्ये एका गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी आणले गेले होते. त्याशिवाय मे महिन्यात सांगलीहून आलेल्या एक वर्ष चार महिने वयाच्या छोट्या मुलावरही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या हृदयामध्ये भोक होते आणि त्यामुळे त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. ही शस्त्रक्रियाही यशस्वीपणे पार पडली.
केडीएएच अधिकाऱ्यांनी स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने रुग्णांच्या कुटुंबियांना तपशीलवार नियोजन करण्यात मदत केली व त्यात शहर/जिल्ह्याच्या सीमेवरील महामार्गावरील पोलिस अधिकाऱ्यांशी ई-पासेससंदर्भात बोलून प्रवासाची समस्या सोडवण्यापासून त्यांचा हॉस्पिटलपर्यंतचा प्रवास सुरळीत आणि वेळेवर होईल याची काळजी घेण्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश होता. कोव्हिड महामारी आणि लॉकडाउनदरम्यान सर्व आव्हानांचा सामना करून पूर्ण करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियांचा अभिमान असल्याची भावना केडीएएचच्या चिल्ड्रेन हार्ट सेंटरचे संचालक डॉ. सुरेश राव यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये असताना ३० हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. या मुलांना तातडीच्या वैद्यकीय सेवेची गरज होती. शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याच्या जोखमीपेक्षा ती केल्यावर होणारा लाभ मोठा असल्यामुळे आम्ही वेळोवेळी शस्त्रक्रिया करण्याचे निर्णय घेतले.’’
पेडिअट्रिक कार्डिओलॉजीच्या सल्लागार डॉ. स्नेहल कुलकर्णी म्हणाल्या,’’पालकांनी आपले मूल जन्मजात हृदयविकाराचा कसा सामना करेल याचा विचार करून दुःखी होऊ नये, वेळेवर निदान झाल्यास योग्य व्यवस्थापन करता येते आणि बाळाला नेहमीसारखे वाढवून आनंदी जीवन देता येऊ शकते. जन्मजात हृदयविकार असलेल्या मुलांना निरोगी आणि संपन्न आयुष्य मिळवून देणे हे केडीएएचचे उद्दिष्ट आहे.’’
No comments:
Post a Comment