अजिंक्य देव हे मराठी सिनेसृष्टीतील एक एव्हरग्रीन व्यक्तिमत्व आहे. आजही अनेक तरुणींना चार्मिंग वाटणारे अजिंक्य देव, त्यांच्या उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक चाहत्यांनी त्यांच्या विविध भूमिकांचे कौतुक केलेले आहे. येत्या रविवारी 'झी टॉकीज'वर 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर'च्या निमित्ताने प्रदर्शित होत असलेल्या 'सौ. शशी देवधर' या चित्रपटातील त्यांची भूमिका यापैकीच एक आहे. या भूमिकेविषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, खास तुमच्यासाठी
१. 'सौ. शशी देवधर' या चित्रपटाविषयी थोडंसं सांगा.
या चित्रपटाचे कथानक ज्याप्रकारे लिहिलेले होते, ते बघूनच मला हा चित्रपट करावासा वाटला होता. एक वेगळ्या धाटणीचा आणि थ्रिलर असा हा सिनेमा होता.कथा ऐकत असतानाच यात भूमिका करण्याचा निर्णय मी घेतला होता असं म्हणता येईल.
२. या चित्रपटातील तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल?
घराबाहेर पडल्यावर अचानक, आपलं घर आणि कुटुंब सुद्धा विसरून गेलेल्या एका स्त्रीला त्या मानसिक धक्क्यातून सावरणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका मी यात केली आहे. या सर्व प्रवासात तो तिच्या प्रेमात पडतो आणि चित्रपटातील रंगत वाढते. ही भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. पण, या कथानकासाठी आणि भूमिकेसाठी ती मेहनत घेण्याची तयारी निश्चितपणे होती.
३. सई ताम्हणकर सोबत पुन्हा एकदा काम करण्याचा योग या चित्रपटाच्या निमित्ताने आला. हा अनुभव कसा होता?
या चित्रपटात, सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत आहे. पुन्हा एकदा तिच्यासोबत काम करायला खरंच मजा आली. शिवाय तुषार दळवी सुद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. एकूणच, सोबत काम करण्याचा अनुभव मजेशीर आणि आनंदाचा होता.
४. सेटवर घडलेला एखादा गमतीशीर असा प्रसंग तुम्हाला आठवतोय का?
गमतीशीर असा प्रसंग नाही, पण चित्रीकरणाच्या वेळी एक सिन करत असताना खूप मजा आली होती. नायिकेला संमोहित करून, भूतकाळात घेऊन जाण्याचा तो प्रसंग होता. त्याचं चित्रीकरण करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली होती. हा काहीसा वेगळा आणि नवा अनुभव असल्याने मला अधिक मेहनत घ्यावी लागली.
५. या चित्रपटाचा 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' झी टॉकीजवर होत आहे. याबद्दल प्रेक्षकांना काय आवाहन कराल?
मराठी चित्रपटांमधील एक निराळा चित्रपट म्हणून प्रेक्षकांनी 'सौ. शशी देवधर' नक्कीच पाहावा. या वेगळ्या धाटणीच्या सिनेमाला योग्य न्याय देण्याचं काम लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार या सर्वांनी केलं आहे. त्यामुळे, एक उत्कृष्ट व परिपक्व अशी कलाकृती अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा.
No comments:
Post a Comment