Friday, 27 September 2019

'धप्पा' देणाऱ्या दिग्दर्शकाशी खास बातचीत!!

एक उत्तम सामाजिक संदेश सर्वांपर्यंत पोचवणारा 'धप्पा' हा चित्रपट, येत्या रविवारी 'झी टॉकीज'वर पाहायला मिळणार आहे. या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या निमित्ताने, चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्याशी केलेली ही खास बातचीत. 
१. चित्रपटाची संकल्पना निराळी आणि अनोखी आहे. ही कथा सुचण्यामागे काय विचार होता?
ही कथा गिरीश कुलकर्णी यांनी उत्तमरित्या लिहिलेली आहे. पुण्यातील एका हाऊसिंग सोसायटीत घडलेल्या घटनेवर ही कथा आधारित आहे. गिरीश कुलकर्णी यांची लेखनशैली व संकल्पना फुलवण्याची हातोटी उत्कृष्ट आहे.
२. चित्रीकरणादरम्यान घडलेली एखादी आठवण सांगाल का?
चित्रीकरणात एक प्रसंग आहे, ज्यात काहीजण येऊन मुलं तालीम करत असलेल्या जागील सर्व गोष्टी, त्यांचा सेट विखरून टाकतात. या प्रसंगाबद्दल मुलांना काहीच सांगितलेले नव्हते. मुलं नसतांना, या सिनची एक तालीम आम्ही केली होती. त्यानंतर, आम्ही त्या मुलांना ते नेहमी करत असलेल्या पद्धतीने तालीम करायला सांगितली. त्याचवेळी मधेच या इतर मंडळींनी येऊन सेट उद्धवस्त केला. त्यामुळे मुलांच्या अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया आम्हाला या प्रसंगात चित्रित करता आल्या. 
३. लहान मुलांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
सगळीच मुलं हुशार आणि चुणचुणीत होती. लहान असूनही, त्यांच्याकडून मिळणारे सहकार्य उत्तम होते. वय कमी असूनही, त्यांची एनर्जी बघण्यासारखी आहे. त्यामुळे या मुलांसोबत काम करायला खूप मजा आली. 
४. चित्रपट दिग्दर्शित करत असतांना, कुठल्या गोष्टी आव्हानात्मक वाटल्या?
कुठलाही चित्रपट किंवा मालिकांचे दिग्दर्शन करणे, हे आव्हानात्मक असतेच. हा चित्रपट सुद्धा त्याला अपवाद नव्हताच. चित्रपटाच्या सुरुवातीलाच, रिक्षांच्या शर्यतीचा एक प्रसंग आहे. त्याचे चित्रीकरण करणे, सर्वात जास्त आव्हानात्मक होते. अर्थात, हे आव्हान स्वीकारणं मजेशीर असतं.
५. 'धप्पा' हा चित्रपट राष्ट्रीय पातळीवर पुरस्कारप्राप्त ठरला. मोठमोठ्या फिल्मफेस्टिवलमध्येही नावाजला गेला. सिनेमागृहात मात्र, त्याला हवी तशी प्रेक्षकसंख्या मिळाली नाही. असं का झालं असावं?
प्रत्येक विषयाचा एक ठराविक प्रेक्षकवर्ग असतो. त्याचा आकडा कालानुरूप बदलत जातो. प्रेमकथांना आज मोठी प्रेक्षकसंख्या मिळते आहे; कालांतराने कदाचित ती कमी झालेली पाहायला मिळेल. सामाजिक संदेश देणाऱ्या सिनेमांचा प्रेक्षकवर्ग मात्र आज कमी आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती पालटलेली दिसू शकेल. मी माझ्या कामाच्या बाबतीत आणि प्रेक्षकसंख्येबाबतीत आशावादी आहे. चांगल्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोचवणे, हेच माझ्या हातात आहे. त्या गोष्टी त्यांनी बघव्यात की नाही, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय ठरतो. मी किंवा इतर कुणीही, प्रेक्षकांवर जबरदस्ती करू शकत नाही.

No comments:

Post a Comment