कधी हलक्या सरींनी मनावर शिडकावा करणारा, कधी वादळी वाऱ्यासंगे उग्र रूप धारण करत काळजात धडकी भरवणारा पाऊस जेव्हा रुसतो त्यावेळी प्रत्येकाला ‘येरे येरे पावसा’ असं म्हणावंच लागतं. कधी अवचित येणारा तर कधी वाट पहायला लावणारा, कधी सारे भेद, मतभेद मिटवून अंतर्बाह्य भिजवणाऱ्या पावसाची रंजक गोष्ट सांगणाऱ्या ‘येरे येरे पावसा’ या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘पावसाचा थेंबही न बघणाऱ्या चिमुकल्यांच्या निरागस हाकेला सारे जण साद घालू, चला पुन्हा एकदा "ये रे ये रे पावसा"... गाऊ’.... या टॅगलाईनसह आलेलं हे मोशन पोस्टर पाऊस किती गरजेचा हे नकळत सांगून जातो.
चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड चाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान तर सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स, चीन) यांची आहे. सत्या शेट्टी, ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत.
मोशन पोस्टर लिंक - https://www.instagram.com/p/ B9V-nI6pOhH/?igshid= fx617rn07zdx
No comments:
Post a Comment