प्रत्येक अभिनेत्याला आपला परफॉर्मन्स आपल्या रसिकांना नैसर्गिक वाटावा, असं वाटत असतं. त्यासाठी अनेक एक्टर्स कसून मेहनतही घेताना आपण पाहतो. अभिनेत्री सई ताम्हणकरला तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी नेहमीच तिच्या चाहत्यांची वाहवाही मिळाली आहे. आणि आता ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’नेही सईच्या ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटा मधल्या भूमिकेसाठी ‘मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ दि इयर’ हा पुरस्कार देऊन सईच्या नैसर्गिक अभिनयाला पोचपावती दिलीय.
झी टॉकीजचे मनापासून आभार मानताना सई म्हणते, “माझ्या कारकिर्दीत झी नेहमीच माझ्या पाठीशी उभं राहिलंय. मला असं वाटतं, तुम्ही कितीही वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत असलात, तरीही परफॉर्मन्ससाठी जेव्हा पुरस्काराची दाद मिळते, तेव्हा ती लाखमोलाची असते. अशी शाबासकी तुम्हांला अजून चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देते. विशेष धन्यवाद माझ्या दिग्दर्शकाला द्यावेसे वाटतायत. दिग्दर्शक उपेंद्र सिधयेने मला पायल मेहताच्या भूमिकेत पाहिलं. माझी आणि अमेयची जोडी रूपेरी पडद्यावर चांगली दिसेल, हे त्याचे व्हिजन होते. उपेंद्रच्या रूपात मला एक चांगला मित्र मिळाला.”
सध्याच्या न्यू नॉर्मलमध्ये नेहमीसारखा मोठा पुरस्कार सोहळा झाला नाही. हे कुठेतरी सई ताम्हणकरही मिस करतेय. ती म्हणते, “स्टेजवर जाऊन पुरस्कार घेणं, ही आम्हा अभिनेत्यांसाठी अभिमानाची बाब असते. पण यंदाच्या परिस्थितीमध्ये अर्थातच हे शक्य नव्हतं. त्यामूळे यंदा अवॉर्ड फंक्शन खूप मिस करतेय.”
आता खरं तर सिनेमा रिलीज होऊन एक वर्ष झालंय. पण सिनेमा अमेझॉन प्राइमवर रिलीज झाल्यावर अनेकांनी तो परत पाहिला. आणि सईला सोशल मीडियावरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या. सई ताम्हणकर म्हणते,” ओटीटीवर सिनेमा रिलीज झाल्यावर काहींनी तो पहिल्यांदाच पाहिला. काहींनी परत पाहिला. माझा आणि अमेयचा स्लो-मोशनमधला डान्स अनेकांना आवडला. ‘अशी अतरंगी भूमिका तूच करू शकतेस’, ‘तूच अशी क्रेझी आहेस’. अशा विविध कॉम्प्लिमेन्ट्स आणि प्रतिक्रिया सतत येत असतात. त्या खूप एन्जॉय करते. आणि आता अवॉर्ड मिळालंय तर त्यानिमित्ताने चाहत्यांना सांगावंस वाटतंय, की आज होऊन जाऊ दे, आईस्क्रिमभातचा बेत.”
No comments:
Post a Comment