आजकाल सर्वत्र फोफावलेल्या सोशल मीडियाच्या युगात सर्वसामान्यांपासून असामान्यांपर्यंत प्रत्येकाचीच या समाज माध्यमात दिसण्या-वावरण्याची स्पर्धा सुरु आहे. मग त्यात सेलिब्रिटीं कसे बरं मागे राहतील? त्यांच्यासाठी तर हे माध्यम सुवर्णमृगच जणू! पण आपल्या मराठी कलावंतांना याचे विशेष सोयरसुतक नाही. काही अपवाद वगळता आपलं काम भलं आणि आपण भले असा विचार करणारे मराठी कलावंत अजूनही आहेत! पण या 'प्लॅटफॉर्मचा' वापर न करणाऱ्यांविषयी त्यांचे फॉलोअर्स बोंबा मारताना दिसतात. अश्याच सेलिब्रिटींपैकी 'क्षिती जोग'!
सध्या ह्या अभिनेत्रीची खूपच तारांबळ उडत आहे. पण ही तारांबळ सोशल मीडियासाठी नव्हे तर प्रयोगांसाठी आहे. तिचं नवं नाटक 'Knock! Knock!सेलिब्रिटी' आलं आहे. या नाटकात ती आणि सुमीत राघवन हे दोनच कलाकार आहेत. अर्थातच संपूर्ण डोलारा त्या दोघांवरच आहे. एकावेळी एकच कलाकार स्टेजवर सलग वावरत असल्याने त्याची दमछाक तर होणारच! त्यात क्षितीने आधी घेतलेल्या टीव्ही आणि चित्रपटांमुळे तिची खरीखुरी 'कसरत' 'Knock! Knock!सेलिब्रिटी' साठी होताना दिसतेय. सकाळ-संध्याकाळ मालिकांचे चित्रीकरण त्यानंतर प्रयोग करून रात्री चित्रपटांचं चित्रीकरणही ती करतेय. जोगांच्या तिसऱ्या पिढीची हि शिलेदार इतकी दमूनही नाटकात तिची एनर्जी तसूभरही कमी पडू देत नाहीये. तिचं म्हणणं आहे, नाटक हे कलाकाराचं टॉनिक असतं! ते दमवत नाही तर माझा थकवा दूर करते! आणि 'नॉक नॉक.... ' सारखं नाटक करायला मिळणं हेच माझं टॉनिक आहे.
No comments:
Post a Comment