Tuesday, 9 July 2019

जेष्ठ दिग्दर्शक पितांबर काळे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'विशेष कौतुक सोहळा!

'कलांगण सांस्कृतिक मंचआणि 'मुंबई एकी ग्रूप' आयोजित 
सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची विशेष उपस्थिती लाभणार!
सातारा जिल्ह्यातल्या पितांबर मारुती काळे या चित्रपट ध्येय्यवेड्या तरुणाने चित्रपट निर्मितीच स्वप्न उराशी बाळगून थेट कोल्हापूर गाठलं. मात्र अनेक निर्मिती संस्था, दिग्दर्शकांचे उंबरे झिजवूनही सहज काम काही मिळेना, पण शिकण्याची उर्मी आणि काम चिकाटी या गुणांमुळे त्यांना १९६८ साली सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनंत माने यांच्याकडे 'गणगौळण' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शनाची पहिली संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांच्यातील उपजत कलागुणांमुळे आणि मितभाषी स्वभावामुळे अनेकानेक उत्तमोत्तम चित्रपटांसाठी नावाजलेल्या दिगर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळत गेली. त्यांनी 'डोंगरची मैना', 'झाला महार पंढरीनाथ', 'लाखात अशी देखणी', 'सोंगाड्या', 'एकटा जीव सदाशिव', 'सुगंधी कट्टा', 'ग्यानबाची मेख', 'दैवत', 'सख्या साजणा', 'मानाचं कुंकू', 'धोंडी धोंडी पाणी दे', 'आली लहर केला कहर', 'हऱ्या-नाऱ्या झिंदाबाद', 'सामना', 'सर्वसाक्षी', 'धूम धडाका' आणि 'माहेरची साडी' अश्या लोकप्रिय चित्रपटांसाठी गोविंद कुलकर्णी, कमलाकर तोरणे, वसंत पेंटर, एन. एस. वैद्य, जब्बार पटेल, रामदास फुटाणे, अरुण कर्नाटकी, महेश कोठारे, विजय कोंडके यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा सांभाळली.
त्यांची स्वतंत्र दिग्दर्शनाची कारकीर्द १९८७ साली ‘इरसाल कार्टी’ या चित्रपटाने झाली. त्यानंतर त्यांनी जवळपास ४०-५० चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून 'सर्जा राजा', 'तांबव्याचा विष्णू बाळा', 'बापू भिरु वाटेगावकर', 'सख्खा भाऊ पक्का वैरी', 'पहिली शेर, दुसरी सव्वा शेर नवरा पावशेर', 'कश्यासाठी प्रेमासाठी'!, 'संघर्ष', 'माहेरचा आहेर', 'तोचि एक समर्थ', 'आई शक्ती देवता',  'दुर्गा आली घरा', 'सौभाग्यवती सरपंच', 'तूच माझी भाग्यलक्ष्मी', 'आता लग्नाला चला', 'मी तुळस तुझ्या अंगणी', 'स्वामी माझे दैवत', 'लग्नाचा धूम धडाका', 'संसार माझे मंदिर', 'गोंद्या मारतंय तंगड', 'लग्नाची वरात लंडनच्या घरात', 'हिरवा चुडा सुवासिनीचा', 'शेगावीचा योगी गजानन', 'गाव थोर पुढारी चोर' इत्यादी चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहेत तसेच त्यांनी 'थरकाप' आणि 'उतावळा नवरा' या चित्रपटांची निर्मितीही केली आहे.
'कलांगण सांस्कृतिक मंच' हा मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत तंत्रज्ञ यांनी विशिष्ट विचारधारेतून स्थापन केला असून या मंचाचा उद्देश कलाक्षेत्रातील घडामोडींना झळाळी देत तंत्रज्ञ - कलावंतांचा विकास व्हावा, आपल्या समृद्ध कलेची जोपासना व्हावी, जेष्ठांना मानसन्मान मिळावा तसेच त्यांच्या कलेचा वारसा, संस्कार नव्या पिढीत रुजावेत ही प्रमुख भूमिका या मंचाची आहे. आपला पहिला कार्यक्रम ही संस्था येत्या १५ जुलै २०१९ रोजी रसिकांसमोर घेऊन येत आहे. चित्रपट, मालिका, नाटक, संगीत क्षेत्रातील आपल्या आदर्श वर्तणुकीद्वारे समाजात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या कलावंतांच्या वैभवशाली कार्याचा गौरव व परिचय नव्या पिढीला व्हावा या दृष्टीने हे एक वेगळं पाऊल मंचाने उचलले आहे. या पहिल्या पर्वाचे सुरुवात जेष्ठ दिग्दर्शक पितांबर मारुती काळे त्यांच्या कार्याचा गौरव करून केली जाणार आहे.
पितांबर काळे यांच्या वयाचे अमृत महोत्सवासोबतच चित्रपटसृष्टीतील योगदानाला ५० वर्षे पूर्ण होत असून हा दुग्दशर्करा योग जुळून आला आहे. हा विशेष कौतुक सोहळा 'कलांगण सांस्कृतिक मंच' आणि 'मुंबई एकी ग्रूप'च्या संयुक्त विद्यमाने साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने पितांबरजी काळे यांच्या चित्रपटसृष्टीतील 'सेलोलाईट ते डिझिटल' या प्रवासावर प्रकाश टाकला जाणार आहे.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले, अशोक सराफ, मनोज जोशी, अलका कुबल, वर्षा उसगावकर, अजिंक्य देव, सयाजी शिंदे, मिलिंद गुणाजी, भारत जाधव, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, गिरीश ओक,  दीपक शिर्के, सुरेखा कुडची, मोहन जोशी, प्रमोद पवार, दीपक देऊळकर,  प्रिया बेर्डे, चेतन दळवी, अशोक शिंदे, विजय पाटकर, प्रेम किरण, राहुल सोलापूरकर, असरानी व सुनील शेट्टी यांसोबतच राजदत्त, जब्बार पटेल, रामदास फुटाणे, विजय देशमुख, दीपक देशमुख, अण्णा देशपांडे, पी. वाय. कोळी, सतीश रणदिवे, प्रताप गंगावणे, कांचन नायक, सुरेश देशमाने, भास्कर जाधव, एम. दस्तगीर, चांदभाई शेख, समीर दीक्षित, आबा गायकवाड, विजय खोचीकर, चैत्राली डोंगरे, अच्युत ठाकूर, इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे मान्य केले आहेत.
सोमवार दिनांक १५ जुलै २०१९, रोजी दुपारी ४:३०वाजता,  रवींद्र नाट्यमंदीर मिनी ऑडिटोरियम, ३ रा मजला, पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई -४०००२५ येथे हा कौतुक सोहळा रंगणार असून चित्रपट सृष्टीतील मान्यवरांच्या सोबत त्यांच्यावर प्रेम करणार्या  जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थितीत रहावे असे आवाहन 'कलांगण सांस्कृतिक मंच' आणि 'मुंबई एकी ग्रूप'ने केली आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी  विनामूल्य खुला असून काही रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment