‘बालक पालक’ सिनेमाने सिनसृष्टीत पदार्पण करणा-या प्रथमेश परबला ह्या सिनेमानंतर विशु नाव पडलं. तर ‘टाइमपास’ रिलीज झाल्यावर प्रथमेशला त्याचे चाहते दगडु म्हणू लागले. आता प्रथमेशला त्याची ‘टकाटक’ फिल्म रिलीज झाल्यावर त्याचे चाहते ह्या चित्रपटातल्या भूमिकेच्या नावाने हाक मारू लागलेत.
प्रथमेश परब आता जिथे जाईल तिथे त्याला ‘ठोक्या’ अशी हाक ऐकायला येते. प्रथमेश ह्याविषयी म्हणतो, “माझ्या सिनेमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता सोशल मीडियावरून भरभरून प्रतिक्रिया येऊ लागल्यात. सिनेमा रिलीज झाल्यावर मी त्याविषयीच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात फिरलो. पूर्वी कुठेही दिसलो, तर फॅन्स ए दगडु अशी हाक मारत आता ठोक्या म्हणू लागलेत. “
प्रथमेश म्हणतो, “विशु काय दगडु काय किंवा ठोक्या काय .. ह्या सर्व भूमिकांचं क्रेडिट अर्थातच माझ्या त्या-त्या सिनेमाच्या लेखक-दिग्दर्शकांचं आहे. सध्या ठोक्या लोकांना आवडतोय. ठोक्या सारखा आपल्याला एक मित्र असावा, असं प्रत्येक मुलाला आणि मुलीला वाटतंय, हे ह्या भूमिकेचं यश आहे. खरं तर ठोक्या सिनेमाचा हिरोच आहे. पण तो कुठेही हिरोसारखा न वागता वावरल्याने प्रेक्षकांना आपलासा वाटतो. “
प्रथमेशसाठी हा सिनेमा पाहायला जाणा-यांची संख्या जास्त आहे. त्याविषयी विचारल्यावर प्रथमेश म्हणाला, “हो, अशा प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर मी सुध्दा वाचतो आहे. डोक्याला जाम लावायचा ह्यामध्ये माझा एक सीन आहे. तो पाहताना, प्रेक्षकांची हसता हसता अक्षरश: मुरकुंडी वळते. ह्यामध्ये माझा एकही संवाद नसतानाही प्रेक्षकांनी हा सीन उचलून धरलाय.”
प्रथमेशचा ह्या सिनेमामध्ये एक मोनोलॉगही आहे. अनेक चाहते ह्या मोनोलॉगची तुलना प्यार का पंचनामा फिल्ममधल्या अभिनेता कार्तिक आर्यनच्या मोनोलॉगशी करतायत. प्रथमोश म्हणतो, “माझ्या मोनोलॉगवर चाहत्यांच्या तर प्रतिक्रिया येतच आहेत. पण फिल्ममेकर गोविंद निहलानी ह्यांनी जेव्हा ही फिल्म पाहिली. तेव्हा त्यांनी मला शाबासकी देत म्हटलं होतं की, हा टकाटक मधला सर्वोत्तम सीन आहे. त्यांच्यासारख्या मोठ्या फिल्ममेकर कडून ही कौतुकाची थाप मिळणं, भाग्याचंच आहे. “
No comments:
Post a Comment