‘रयतेचे राजे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती वेगळी सांगण्याची गरज नाही, मात्र थोर छत्रपतींना जन्म देणाऱ्या ‘अखंड स्वराज्याची सावली’ असे ज्यांचे यथार्थ वर्णन केले जाते त्या जिजाऊ माऊलीची जीवनगाथा देखील तितकीच अगाध आहे. ही जीवनगाथा जाणून घेत आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या रीतीने उलगडणाऱ्या राजमाता जिजाऊंचा हा प्रेरणादायी प्रवास आतासोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून आपल्याला पहाता येणार आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ सारखी लोकप्रिय मालिकेची निर्मिती करणाऱ्या जगदंब क्रिएशन्स’ या निर्मिती संस्थेनेच या मालिकेची निर्मिती केली आहे. सोमवार १९ ऑगस्ट पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य,शौर्य, दुर्दम्य आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती आणि गोरगरीबांप्रती प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले. कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार करणाऱ्या जिजाऊंनी उपेक्षित, वंचित, शोषित जनतेचा प्राधान्याने विचार केला. आपल्या जहागीरदारीचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका कायम घेणाऱ्या जिजाऊंच्या स्वराज्यनिर्मितीच्या ध्येयाचे बीज आपल्याला या मालिकेतून पहायला मिळणार आहे. अभिनेत्री अमृता पवार आपल्याला जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहे. भोर परिसरात या मालिकेचे चित्रीकरण सध्या सुरु आहे.
शहाजीराजांची स्वराज्य संकल्पना ज्यांनी जपली, जोपासली आणि स्वराज्यरक्षक शिवरायांना घडवलं त्या राजमाता जिजाऊंची अमूल्य गाथा आजच्या पिढीपर्यंत पोहचणे अत्यंत गरजेच आहे. यासाठीच ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या निर्मितीचे शिवधनुष्य पेलल्याचे या मालिकेचे निर्माते अमोल कोल्हे सांगतात.
ही मालिका केवळ मनोरंजन नाही तर संस्कार असेल आणि तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाचा हुंकार असेल! तेव्हा राजमाता जिजाऊंचा हा ध्येयशाली प्रवास ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून सोमवार १९ ऑगस्ट पासून सोनी मराठी वाहिनीवर अवश्य पहा.
No comments:
Post a Comment