Monday, 19 October 2020

Zee Talkies | Zee Talkies Comedy Awards 2020 winners list

 झी टॉकीजवर लवकरच झळकणार झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस् २०२०चा दिमाखदार सोहळा...

हि पहा विजेत्यांची यादी
माणसाच्या दुःखावर किंवा वेदनांवर हास्य हे सर्वोत्तम औषध मानलं जातं आणि अशाच विनोदाची कास पकडत वर्षांनुवर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना हसवणारे विनोदवीर आणि त्यांचं योगदान मराठी रंगभूमी आणि सिनेमामध्ये न विसरता येणारं आहे. संपुर्ण सिनेमा किंवा नाटक पहाताना काही क्षणासाठी येणारे हे विनोदी पंचेस प्रेक्षकांना मध्येच भरभरून हसवतात. आत्तापर्यंत असे अनेक संवाद किंवा कलाकारांच्या विनोदी शैली प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यात, सोशल मिडीयावरही हे विनोद विविध पद्धतीने ट्रेंड होताना पहायला मिळतात. मात्र या विनोदवीरांचा जेव्हा प्रस्थापित पुरस्कार सोहळ्यामध्ये सन्मान केला जातो तेव्हा तो सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता आणि अभिनेत्री या नामांकना पुरताच मर्यादित दिसतो, हे  विनोदी संवाद लिहिणाऱ्यांचे किंवा दिग्दर्शित करणाऱ्यांचे योगदान यात दुर्लिक्षत रहाते. झी टॉकीजने विनोद ही संकल्पना अधोरेखित करत संपुर्ण पुरस्कार सोहळाच या विभागाला समर्पित करण्याचं ठरवलं आणि यातूनच सात वर्षांपुर्वी सुरुवात झाली ती झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस सोहळ्याची.
दरवर्षी या सोहळ्यामध्ये आपल्या विनोदी शैलीने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यात हसता हसता पाणी आणणाऱ्या होतकरु कलाकारांचा आणि त्यांच्या उल्लेखनीय कामाचा सन्मान केला जातो. ताण तणाव आणि विविध आव्हानांनी पिचलेल्या आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये हास्याचा थंडगार वर्षाव हा अवॉर्ड सोहळा घेऊन येतो. यावर्षी या सोहळ्याचे हे सातवे वर्ष. निवडक कलाकारांच्या उपस्थितीत आणि सामाजिक जबाबादारी पाळत हा सोहळा नुकताच पार पडला.
यावर्षी सिनेमा विभागांसाठी जाहीर झालेल्या नामांकनाच्या यादीमध्ये येरे येरे पैसा २, चोरीचा मामला, टकाटक, स्वीटी सातारकर, गर्लफ्रेंड आणि गर्ल्स या सिनेमांचा समावेश करण्यात आला. ज्यात अधिकाधिक पुरस्कार पटकावत चोरीचा मामला या सिनेमाने बाजी मारली.
धमाल पंचेस आणि त्याहूनही धमाल अभिनय याने प्रेक्षकांना हसून हसून बेजार केलेल्या चोरीचा मामला या सिनेमाने यावर्षीचा सर्वोत्कृष्ट विनोदी सिनेमाचा पुरस्कार पटकावला. तर आपल्या लेखणीतून धमाकेदार विनोद आणि संवेदनशील विचार यांची सांगड घालत प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा तयार करण्यात लेखक उपेंद्र सिधये यांना यश आलं, म्हणूनच गर्लफ्रेंड या सिनेमासाठी उपेंद्रला सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार दिला गेला. उत्तम अभिनेता आणि तेवढाच उत्तम दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या प्रियदर्शन जाधव याला चोरीचा मामला या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा यावर्षीचा झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड देण्यात आला.
एकाहून एक सरस भुमिका साकारत प्रेक्षकांच्या ह्रदयावर स्वतःची अभिनयाची वेगळी छाप सोडलेला अभिनेता जितेंद्र जोशी याला पुन्हा एकदा चोरीचा मामला या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिला गेला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी यावर्षी दोन अभिनेत्रींची वर्णी लागली. चोरीचा मामला या सिनेमासाठी अमृता खानविलकर आणि स्वीटी सरकार या सिनेमासाठी अमृता देशमुख या दोघींना यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस देण्यात आला.  
टकाटक या सिनेमामधल्या टकाटक अभिनयासाठी अभिनेता प्रथमेश परब याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा तर चोरीचा मामला या सिनेमातल्या मनोरंजक अभिनयासाठी किर्ती पेंढारकर हीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय मराठी सिनेमातला ग्लॅमरस चेहरा म्हणजेच अभिनेत्री सई ताम्हणकर हिला गर्लफ्रेंड या सिनेमामधल्या तिच्या बहारदार अभिनयासाठी गोदरेज एक्सपर्ट रिच क्रिम हेअर कलर मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स या विशेष पुरस्काराने सन्मानित केलं गेलं.
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस् च्या या यशस्वी प्रवासाबद्दल बोलताना झी टॉकीजचे बिजनेस हेड बवेश जानवलेकर यांनी समाधान व्यक्त केलं. याबद्दल बोलताना ते सांगतात, "मराठी सिनेमा क्षेत्राला विनोद आणि हास्याचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे जो आपल्या आयुष्याचा आणि संस्कृतीचाही एक अविभाज्य घटक बनलाय. याबद्दलची कृतज्ञता म्हणून गेली सात वर्ष आम्ही हा झी टॉकीज कॉमेडी पुरस्कार सोहळा आयोजित करत आलोय. कोरोनाच्या प्रभावामुळे यावर्षी हा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि प्रेक्षकांविना पार पडला गेला तरीही त्यातल्या कार्यक्रमांमध्ये आणि सादरीकरणामध्ये आम्ही कोणतीच तडजोड केली नाही. हा सोहळा पहाताना प्रेक्षकांचे पुरेपर मनोरंजन होईल याकडे आम्ही काटेकोरपणे लक्ष दिलेय. सध्याच्या परिस्थितीला साजेशी अशी संकल्पना डोळ्यासमोर ठेवत साजरा झालेला हा सोहळा सलग सातव्या वर्षीही प्रेक्षकांना भरभरुन आनंद देईल याची मला खात्री आहे."

No comments:

Post a Comment