• 'फॅटफिश' एन्टरटेन्मेन्ट प्रस्तुत ''अवांछित'' पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण चित्रीकरण!
• दोन संस्कृतीचं आदान-प्रदान! 'सिटी ऑफ जॉय' कोलकातामध्ये चित्रीकरणास प्रारंभ!
पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना त्यांच्या बलाढ्य संस्कृती आणि परंपरांचा वारसा आहे. आणि दोन्हीमध्ये बऱ्यापैकी साधर्म्यही आहे. कला - साहित्य - संस्कृतीसह निसर्गा रचनेत कमालीचं साम्य आढळून येते. पश्चिम बंगालचं हे वैभव पहाण्याची संधी दिग्दर्शक शोभो बासू नाग आणि निर्माते प्रीतम चौधरी, विकी शर्मा सहयोगी निर्माते त्यांच्या 'फॅटफिश एन्टरटेन्मेन्ट' प्रस्तुत 'अवांछित' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना लवकरच देणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पश्चिम बंगालच्या जुन्या आणि नव्या कोलकाता शहरात सुरु झाले आहे.
'अवांछित'मध्ये नव्या आणि जुन्या कोलकाताची रूपकात्मक कथा दिसणार असून ती वडील मधुसूदन गव्हाणे आणि मुलगा तपन गव्हाणे यांच्या नात्याप्रमाणे विभागली आहे. वृध्दाश्रमातल्या नोकरीत गुंतलेल्या मधुसूदन यांचं नकळत त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते आणि त्यामुळेच आईने जीव गमावल्याची भावना मनात बाळगून तारुण्यात पदार्पण करणारा तपन त्यांच्याशी खटकून वागू लागतो. बापलेकातला दुरावा वाढत जातो. त्यांच्या भावविश्व, नातेसंबंधांची वीण कधी घट्ट तर कधी सैल होत जाते. कसलेल्या मराठी कलावंतांसोबत निर्माण होणाऱ्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी बंगाली कलावंतांनीही कंबर कसली आहे. मराठी प्रमुख कलावंतांसोबतच पडद्यामागील बहुतांश कलावंत बंगाली आहेत.
निर्माते प्रीतम चौधरी हे गेली २२ वर्ष बंगाली चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलपात्र चित्रपटांच्या निर्मितीत सिंहाचा वाटाआहे. आजमितीस त्यांनी 'निर्बक', 'राजकहीनी', 'अभिशोपतो नायटी', 'मिश्वर राहोष्य', 'लव्ह आज कल', 'द जापनीज वाईफ', 'ऑटोग्राफ', 'हेमलॉक सोसायटी', 'भोझेना शेय भोझेना', 'द वैटिंग सिटी', 'जोश', 'झुल्फिकार' यांसह जवळपास पन्नासहून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत प्रथम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शक शोभो बासू नाग यांना दोन दशकांचा मीडिया क्षेत्रातला अनुभव आहे. 'दिवानगी', 'ख्वाईश', 'देवदास' या दर्जेदार चित्रपटांच्या संकलनाने त्यांनी सुरुवात केली. उत्कृष्ट स्टोरीटेलर असलेल्या शोभो यांनी जाहिरात, चित्रपटांसोबतच 'झी नेटवर्क'च्या 'कोर क्रिएटिव्ह टीम' अंतर्गत 'सीक्रेट सुपरस्टार्स', 'रुस्तम', 'करीब करीब सिंगल', 'मणिकर्णिका' अशा अनेक चित्रपटांसाठी काम पाहिले असून 'स्टार आनंद', 'टाइम्स नाऊ', 'झी कॅफे', 'झी स्टुडिओ', 'झी बांगला', 'झी बांगला सिनेमा', 'झी अनमोल' या चॅनल्सच्या निर्मितीत योगदान दिले आहे.
'गणवेश' या महत्वाकांक्षी मराठी चित्रपटाची निर्मिती - दिग्दर्शन करणारे युवा सिनेमॅटोग्राफर अतुल जगदाळे 'अवांछित' चित्रपटासाठी डीओपी अर्थात डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर बनून मराठी आणि बंगाली कलावंतांमध्ये दुवा साधणार आहेत. या चित्रपटात अष्टपैलू कवी सौमित्र उर्फ अभिनेते किशोर कदम एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असून युवा अभिनेता अभय महाजन व मृण्मयी गोडबोले या तरुण जोडगोळीसोबतच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, योगेश सोमण यांसह बंगाली अभिनेते बरून चंदा प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. मराठी बंगाली तंत्रज्ञ - कलावंतांच्या संयुक्त प्रयत्नांतून निर्माण होणाऱ्या या कलाकृतीमध्ये दोन कला - संस्कृतीचा संगम बहार आणले.
‘एव्हढंस आभाळ’ या चित्रपटातून या पूर्वी कोलकाता शहर दिसले आहे. पण या शहरात संपूर्ण चित्रित होणारा 'अवांछित' हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे. मनोज मित्रा यांच्या 'सज्जानो बागान' या बंगाली साहित्यकृतीवर 'नारबाची वाडी' तर रवींद्रनाथ टागोर यांच्या 'दृष्टी' या साहित्यकृतीवरील 'तप्तपदी' हे अलीकडील काळातले गाजलेले मराठी चित्रपट होते. दिग्दर्शक शोभो बासू नाग यांच्या मूळ कथेवर 'अवांछित' बेतला असून त्यावर पटकथा व संवाद निर्मिती योगेश जोशी यांनी केली आहे. ओंकार कुलकर्णी यांनी रचलेल्या गीतांना संगीत व पार्श्वसंगीत राष्ट्रीय पारितोषिक विजेते आघाडीचे बंगाली संगीतकार अनुपम रॉय यांनी दिले आहे. त्यांचं हे संगीत मराठी रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. या चित्रपसाठी विकी शर्मा सहयोगी निर्माते असून अनु बासू हे आकर्षक प्रॉडक्शन डिझाईन करीत आहेत त्यावर कलादिग्दर्शन अमित डे करणार आहेत. वेशभूषाकार जयंती सेन यांनी स्टाईल व कॉश्च्युम डिझाईन करणार असून रंगभूषा प्रसेनजीत यांची असणार आहे. या चित्रपटासाठी कार्यकारी निर्मितीची धुरा डेबोलीन सेन यांच्या हाती सोपवण्यात येणार आहे.
यापूर्वी कोलकातामध्ये बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण कोलकातामध्ये झाले आहे. मात्र, प्रथमच संपूर्ण मराठी चित्रपटाचे चित्रीकरण या शहरात होत आहे. हे चित्रीकरण प्रामुख्याने उत्तर कोलकाताच्या विविध भागांत आणि दक्षिण कोलकाताच्या काही भागात होणार आहे. हा चित्रपट मराठी असला तरी कथेचा संदर्भ कोलकाताशी आहे. जुन्या आणि नवीन कोलकाताची गोष्ट या चित्रपटात असून ती मराठी प्रेक्षकांना निश्चित आवडेल आणि ते या चित्रपटासोबतच पश्चिम बंगालच्याही प्रेमात पडतील, अशी प्रतिक्रिया या चित्रपटाचे डीओपी व क्रिएटिव्ह प्रोड्युसर अतुल जगदाळे यांनी दिली.
No comments:
Post a Comment